भीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुक केल्यास मिळणार मोफत प्रवासाची


नवी दिल्ली : कॅशलेस तिकीटाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवी योजना सुरु केली आहे. रेल्वेतर्फे प्रवाशांना भीम अॅपच्या माध्यमातून बुकींग केल्यास एक खास ऑफर देण्यात येणार आहे. ही योजना १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आली आहे.

गेल्याच महिन्यात आपल्या वेबसाईटवर भीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा आयआरसीटीसीने उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंगला भीम अॅपद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना नवी ऑफर देऊ केली आहे. रेल्वेच्या नव्या ऑफरनुसार, पाच प्रवाशांची लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला निवड करण्यात येईल. या पाचही प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत मिळतील. याच महिन्यात यातील पहिल्या पाच विजेत्यांची घोषणा केली जाईल.

ही योजना १ डिसेंबरपासून लागू करण्यात आली असून, याचा लाभ प्रवाशांना ३१ मार्च २०१८ पर्यंत घेता येणार आहे. पण प्रवाशांनी आयआरसीटीसीवर तिकीट बुक करताना भीम अॅप किंवा युपीआय पेमेंटचा वापर केला असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे.