कपडे जास्त टिकवायचे आहेत? मग फ्रिजमध्ये ठेवा


खाद्यपदार्थ अधिक काळ चांगल्या स्थितीत राहावेत म्हणून रेफ्रिजरेटर किंवा फ्रिजचा वापर सर्वमान्य आहे. जगभरात सतत कांही ना कांही संशोधन सुरूच असते. या संशोधनातून काय निष्पन्न होईल याचा अंदाज खुद्द संशोधकांनाही बरेच वेळा नसतो. तोच प्रकार आता फ्रिजच्या बाबतीत घडला आहे. केवळ खाद्यपदार्थ टिकविणे यापेक्षाही फ्रिजचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग समोर आला असून तो आपली रोजची गरज असलेल्या कपड्यांसदर्भात आहे.

फॅशन स्टायलिस्ट डेनिम काडवेल यांच्या म्हणण्याप्रमाणे आपले कपडे वापरल्याने लवकर खराब होतात, कधी त्यांचे रंग जातात, कधी धागे निघतात तर कधी ते फाटतात. कपडे अधिक काळ चांगल्या स्थितीत ठेवायचे असतील , कपड्यांचे आयुष्य वाढवायचे असेल तर फ्रिजचा मोठा उपयोग होऊ शकतो. कपडे भिजवून व पॉलिथिनच्या बॅगेत घालून फ्रिजरमध्ये ठेवले तर ते अधिक टिकतात असा त्यांचा दावा आहे.

फ्रिजरमध्ये ठेवल्याने कपड्यांचे धागे अधिक मजबूत होतातच पण त्यांचा कलरही कायम राहतो. इतकेच नव्हे तर उणे ७ सेल्शियस तापमानामुळे कपड्यांतील बॅक्टेरिया संपून जातात. प्लॅस्टीक बॅगेत कपडे भरून फ्रिज मध्ये ठेवले तर कपड्यांना येणारा विचित्र वास नष्ट होतो. इतकेच नाही तर कपड्यांचे इलॅस्टीक घट्ट राहण्यासाठीही फ्रिजर उपयुक्त ठरते. यासाठी कपडे ओले करून रात्रभर ते डिप फ्रिजरमध्ये ठेवावे लागतात.