स्मार्टफोनच्या व्यसनामुळे नैराश्य, बेचैनीची जास्त शक्यता


स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य आणि बेचैनी व निद्रानाश यांसारखे आजार वाढण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे.

दक्षिण कोरियातील कोरिया विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा अत्यंत जास्त वापर करणाऱ्या युवकांच्या मेंदूतील रासायनिक समीकरणात असंतुलन निर्माण होते, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या शास्त्रज्ञांनी स्मार्टफोन आणि इंटरनेटचे व्यसन असल्यामुळे किशोरवयीन मेंदूची हालचाल पाहण्यासाठी मॅग्नेटिक रेजोनेन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा (एमआरएस) वापर केला. एमआरएस हा एमआरआयचा प्रकार असून त्यातून मेंदूतील रासायनिक घटकांचे मोजमाप केले जाते.

कोरिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ह्यूंग सुक सियो यांनी रेडियोलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (आरएसएनए) या संघटनेच्या वार्षिक संमेलनात हा शोधनिबंध सादर केला. त्यात त्यांनी इंटरनेट व स्मार्टफोनची सवय लागलेल्या 19 युवकांच्या मेंदूची तुलना निरोगी व्यक्तींशी केली आहे.

या 19 पैकी 12 युवकांना संशोधनाचा भाग म्हणून नऊ आठवड्यांची संवेदनात्मक चिकित्साही देण्यात आली. या संशोधनातील युवकांची निवड एका प्रश्नावलीच्या आधारे करण्यात आली. त्यात त्यांच्या इंटरनेट व स्मार्टफोनचा दैनंदिन वापर, सामाजिक जीवन, उत्पादकता, झोपण्याची सवय आणि भावनांशी संबंधित प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. ‘‘ज्याचे अंक जास्त त्याचे व्यसव जास्त,’’ असे ह्यूंग सुक सियो यांनी सांगितले.