भारताचा फरार विजय माल्या या गावाचा हिरो


भारताने फरार घोषित केलेला उद्योजक विजय माल्या परत ताब्यात मिळावा यासाठी ब्रिटीश सरकारकडे अपील केले असले तरी या माल्याने ज्या गावात आश्रय घेतला आहे, त्या गावासाठी मात्र तो हिरोपेक्षा कमी नाही. लंडनपासून ४८ किमी वर असलेल्या टेविन या गावी माल्या याचा प्रचंड मोठा व्हिला असून येथील नागरिकांसाठी माल्या हा हिरो आहे. या गावची लोकसंख्या आहे २००० व या नागरिकांच्या मनात माल्यासाठी मोठाच आदर असल्याचे दिसते.

भारतातील १७ बँकांना ९ हजार कोटींना गंडा घालून लंडनला पळालेल्या माल्यावर मनी लाँड्रींग तसेच लोकांचे पैसे बुडविल्याचे आरोपही आहेत. मात्र टेविन गावातल्या नागरिकांच्या मते श्रीमंत व्यक्तींना कांही ना कांही अडचणी असतातच. त्यांना माल्या भारत सरकारला हवा असलेला आरोपी आहे याची माहिती आहे मात्र तरीही तो त्यांचा हिरो आहे. येथील बार मालक सांगतो, आमच्या गावाला माल्याने क्रिसमस ट्री गिफ्ट दिले आहे. या झाडासाठी १६ लाख रूपये मोजायचे होते व कुणीही ते भरायला तयार नव्हते पण माल्याने ते भरले आहेत.


या गावातील लोक फॉर्म्युला वन कार रेसचे शौकीन आहेत व माल्या तर फॉर्म्युला वन रेसचा एक हिस्साच आहे. गावातील कार शोमध्ये त्याची नेहमी उपस्थिती असते त्यामुळेही नागरिक त्याच्यावर फिदा आहेत. या नागरिकांना माल्याचे भारताला प्रत्यर्पण होऊ नये तर त्यांच्या गावातच त्याने राहावे असे वाटते. त्यांच्या मते तो इतका श्रीमंत आहे पण त्याला श्रीमंतीचा गर्व नाही. गावच्या कार्यक्रमात तो पत्नी, मुलांसह सहभागी होतो व श्रीमंतांसारखा तो मुळीच वागत नाही. त्यामुळे तो त्यांना आदरणीय आहे.