एटीएममध्ये अडकलेले पैसे असे परत मिळवा


आपल्याला रोख रकमेची गरज भासेल तेव्हा आपण बहुतेक वेळा एटीएम मशीनचा वापर करतो. अनेकदा मागितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम एटीएममधून मिळण्याचे प्रकार घडतात तसेच मागितलेली रक्कम न मिळताच पैसे खात्यातून डेबिट झाल्याची पावती मिळण्याचे प्रकारही घडतात. पैसे न मिळताच खात्यातून डेबिट झाले तर ग्राहक गोंधळून जातो व अशा वेळी काय करावे हे त्याला अनेकदा माहिती नसते. अशा वेळी कोणताही पुरावा हाती नसताना बँकेत तक्रार करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही.

असा प्रकार घडलाच तर घाबरून जाण्याचे कारण नसते कारण रिझर्व्ह बँकेने या बाबत स्पष्ट नियम केलेला आहे. त्यानुसार खातेधारकाने कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कार्ड वापरले पण रोख आली नाही व खात्यातून पैसे डेबिट झाले तर बँकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत संपर्क साधायला हवा. बँक बंद असेल तर कस्टरम केअर कॉल करून तक्रार नोंदवायला हवी. ट्रान्झॅक्शन फेल ची मिळणारी स्लीप अशा वेळी अत्यंत उपयुक्त असते ती जपून ठेवावी. यामुळे एटीएमचा वापर करताना स्लीप आवर्जून घ्यायला हवी.

समजा एखाद्या केसमध्ये स्लीप मिळाली नसेल तर बँक स्टेटमेंटचा आधार घेता येतो. तसेच लिखित तक्रारही बँकेकडे देता येते. त्याला स्लीपची फोटोकॉपी जोडावी लागते. ही स्लीप महत्त्वाची असते कारण त्यावर एटीएमचा आयडी, लोकेशन, वेळ व बँकेचा रिस्पॉन्स कोड प्रिंट केलेला असतो. अशा वेळी पैसे न मिळाल्याचे बँकेने मान्य केले व आठवड्याच्या आत तुमची रक्कम खात्यात क्रेडीट केली नाही तर बँकेला दररोज १०० रूपये दंड म्हणून खातेदाराला द्यावे लागतात.

एटीएममधून पैसे मिळाले नाहीत पण डेबिट पडले तर २४ तास प्रतीक्षा करावी. बहुतेक बँका या काळात तुमचे पैसे खात्यात क्रेडीट करतात. दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले असतील तर मात्र संबंधित बँक पैसे देण्यास नकार देऊ शकते. अशा वेळी सीसीटीव्ही ची पडताळणी केली जाते. सीसीटीव्हीवरील पूर्ण फूटेज तपासले जाते व पैसे न मिळताच डेबिट पडल्याची खात्री पटली तर पैसे परत केले जातात.

Leave a Comment