शाही घराण्यातील परिवारजनांना विवाह करताना करावे लागते काही परंपरांचे पालन


ब्रिटनच्या शाही परिवारामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. याचे कारण आहे प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा ठरलेला विवाह. हा विवाहसोहोळा २०१८ सालच्या मे महिन्याच्या सुमारास संपन्न होणार असल्याचे वृत्त नुकतेच शाही परिवाराच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केले आहे. ब्रिटनचा शाही परिवार प्रत्येक बाबतीत अनेक दशके चालत आलेल्या परंपरांचे पालन करीत आला आहे. किंबहुना ब्रिटनच्या शाही परिवारातील परंपरा त्यांची खासियत आहे. त्याचप्रमाणे शाही परिवारामध्ये विवाह होणार असल्यास त्यासंबंधी पाळावयाच्या काही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत.

लग्नसमारंभाच्या वेळी नववधूने सफेद पोशाखच परिधान करावयास हवा, अशी शाही घराण्याची प्रथा आहे. ही प्रथा १८४० सालापासून, राणी व्हिकटोरीयाच्या काळापासून चालत आली आहे. तसेच शाही घराण्यामध्ये विवाह निश्चित झाल्याचे वृत्त सर्वप्रथम शाही परिवाराच्या प्रवक्त्यांकडून घोषित केले जाते. त्यापूर्वी कोणालाही याबद्दल वाच्यता करण्याची मनाई आहे. अगदी ज्यांचा विवाह ठरला आहे, ते दाम्पत्य देखील या नियमाला अपवाद नाही. विवाह संपन्न झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याला संपूर्ण परिवारासोबत छायाचित्र घ्यावे लागते. हे छायाचित्र नंतर प्रसिद्ध केले जाते. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह पुढील वर्षी मे महिन्यात होणार आहे. तोवर प्रिन्स विलियम आणि केट यांचे तिसरे अपत्य जन्माला आले असून, त्याचा ही समावेश हॅरी आणि मेगन यांच्या विवाहोत्तर छायाचित्रामध्ये असण्याची पूर्ण शक्यता आहे.

विवाह ठरल्यानंतर नवपरिणीत जोडप्याला एक औपचारिक मुलाखत द्यावी लागते. तसेच या विवाहाची आमंत्रणे खुद्द ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ हिच्या नावाने पाठविली जातात. विलियम आणि केटच्या विवाहासाठी राणी एलिझाबेथच्या नावाने १९०० आमंत्रणे पाठविली गेली होती. विवाहोत्तर आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागत समारंभासाठी दोन केक बनविले जातात. त्यापैकी एक केक हा परंपरागत पद्धतीने बनविलेला फ्रुट केक असतो, तर दुसरा केक खास विवाहासाठी तयार करविलेला असतो.

चर्चमध्ये विवाहासाठी प्रवेश करताना नववधूच्या हातामध्ये फुलांचा गुच्छ असतो. ब्रिटनच्या शाही परिवारातील नववधूने हा गुच्छ वेस्टमिन्स्टर अॅबी मधील ‘ द अननोन वॉरियर ‘, या शहीद सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनविण्यात आलेल्या समाधीस्थलावर ठेवायचा असतो. ह्या परंपरेचे पालन गेल्या तीन पिढ्यांपासून करण्यात येत आहे. तसेच नववधूच्या पुष्पगुच्छामध्ये ‘ मर्टल ‘ या वेलीची एक फांदी असते. ही देखील परंपराच आहे. ही वेल नवदाम्पत्याचे परस्परांवरील प्रेम वाढविण्यास सहायक असते अशी समजूत असल्याने या वेलीच्या लहानशा फांदीचा समावेश नववधूच्या पुष्पगुच्छामध्ये करण्यात येतो.

शाही परिवारातील काही विवाह सेंट जेम्स चॅपल मध्ये संपन्न झालेले आहेत. १६८३ साली राणी अॅन, १७६१ साली राजे जॉर्ज तृतीय, १७९५ साली चौथे जॉर्ज, १८४० साली राणी व्हिक्टोरिया, आणि १८९३ साली पंचम जॉर्ज यांचे विवाह सेंट जेम्स चॅपल मध्ये संपन्न झाले आहेत. विलियम आणि केट चा विवाह वेस्टमिन्स्टर अॅबी मध्ये संपन्न झाला होता. पण हॅरी आणि मेगन यांचा विवाह या परंपरागत ठिकाणांहून वेगळा, सेंट जॉर्ज चॅपल येथे होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

शाही परिवारातील नववधूने रत्नजडीत मुकुट घालण्याची परंपरा आहे. चार्ल्स आणि डायना यांच्या विवाहासाठी डायना हिने तिच्या परिवाराकडून आलेला ‘ स्पेन्सर ‘ परिवाराचा पारंपारिक मुकुट परीधान केला होता. विवाहापश्चात राणी एलिझाबेथ ने डायनाला ‘ लव्हर्स नॉट ‘ नामक हिरेजडीत मुकुट, विवाहानिमित्त भेट म्हणून दिला होता. हा मुकुट आता केट कडे असून, अनेक औपचारिक प्रसंगी केट हा मुकुट परिधान करीत असते. पण मेगन ही राजघराण्यातील नसल्यामुळे तिच्या परिवाराकडे पारंपारिक मुकुट नाही. त्यामुळे राणी एलिझाबेथच्या संग्रही असलेल्या अनेक मुकुटांपैकी एका मुकुटाची निवड करण्याची मुभा मेगनला असेल.

विवाहासाठी जाताना संपूर्ण राजपरिवार आणि नववधू निरनिराळ्या रथांमधून विवाहस्थळी येतात. हे रथ खुले असल्याने रस्त्याच्या दुतर्फा शुभेच्छा देण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना सर्व राजपरिवाराचे दर्शन होते. लग्नाच्या वेळी वधूला घालण्याची अंगठी परंपरेने चालत आलेल्या वेल्श गोल्ड पासून बनविली जाते. हे परंपरा १९२३ पासून अस्तित्वात आली. वेल्श गोल्डची किंमत ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिकेतील सोन्याहून कितीतरी पटी ने अधिक आहे.

विवाहसोहळ्याचा संपूर्ण खर्च शाही परिवारातर्फे केला जातो. तसेच विवाहादरम्यान राजपरिवारातील सदस्य चर्चच्या उजव्या बाजूला आसनस्थ होतात. जर नवरदेव राजपरिवारातील नसेल, तर मात्र राजपारीवार डाव्या बाजूला आसनस्थ होतो. शाही विवाहसमारंभाला आमंत्रित महिला पाहुण्यांनी हॅट घालणे आवश्यक असते. त्याशिवाय त्यांचा पोशाख पूर्ण समजला जात नाही.

विवाहापूर्वी विवाहेच्छुक दाम्पत्याला राणी एलिझाबेथची औपाचीरिकरित्या परवानगी घ्यावी लागते. हा नियम शाही परिवाराच्या सर्व सदस्यांकरिता लागू आहे. विशेषतः राजगादीचे वारस असणाऱ्या पहिल्या सहा शाही वारसांनी राणीची परवानगी घेण्याबद्दलचा उल्लेख शाही नियमावलीमध्ये आहे. ही परंपरा १७२२ सालापासून चालत आली आहे. त्यामुळे मेगन आणि हॅरी यांनी विवाह करण्याचे जरी काही महिने आधीच निश्चित केले असले, तरी या दोघांनाही राणीकडून औपचारिक परवानगी घ्यावी लागली होती.

Leave a Comment