आधार लिंक करणे हे हसण्यावरी घेऊ नका; नाहीतर…


मुंबई : सध्या व्हॉटसअॅपवर आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक जोक्स व्हायरल होत आहेत, पण आधार लिंक करणे हे हसण्यावर घेऊ नका, नाहीतर तुम्हाला काही सेवा घेताना अडचणींचा सामना करावा लागेल.

सध्या चालू असलेले सर्व मोबाईल क्रमांक, रिव्हेरिफाय करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ६ फेब्रुवारी ही आपला मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करायची अंतिम मुदत असून असे न केल्यास, मोबाईल नंबर बंद पडू शकतो. तर नवीन सिम घेण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे.

तर ३१ डिसेंबर २०१७ ची डेडलाईन बँक खाते, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, इक्विटी, म्युच्युअल फंड, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना, यासाठी देण्यात आली आहे. त्यानुसार यासर्व योजनांना आधार कार्ड जरूर लिंक करून घ्या.

तुम्हाला पॅन कार्डशी आधार लिंक न केल्यास आयकर रिटर्न भरता येणार नाही म्हणून ३१ डिसेंबर २०१७च्या आत आधार आणि पॅन लिंक करून घ्या. आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.

त्याचबरोबर आधारचा तपशिल एलपीजी अनुदान, शिष्यवृत्ती योजना, पेंशन आणि शिधापत्रिका धारकांना देणे आवश्यक आहे. ज्या योजनांसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते, त्यासाठीही आधारची माहिती देणे तुम्हाला अनिवार्य आहे. या योजनांच्या लाभार्थींसाठी ३१ डिसेंबर २०१७ ही डेडलाईन आहे. यापूर्वी ही तारीख ३० सप्टेंबर २०१७ होती.