ट्रान्सप्लांट झालेल्या गर्भाशयाद्वारे झाली बाळाची सुखरूप डिलिव्हरी


अमेरीकेमधील टेक्सास या ठिकाणी राहणाऱ्या महिलेचे गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्यात वैद्यकीय तज्ञांना यश मिळाले होते. त्याच ट्रान्सप्लांट झालेल्या गर्भाशयाच्या द्वारे एका नव्या जीवाला जन्म देण्यात महिलेला यश आले आहे. या महिलेची ओळख उघड करण्यास नकार देण्यात आला असून, ह्या महिलेला जन्मतःच गर्भाशय नसल्याने ट्रान्स प्लांट द्वारे तिला नवे गर्भाशय देण्यात आल्याचे समजते. डॅलास मधील बेलर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मध्ये या महिलेची डिलिव्हरी यशस्वीरित्या करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना मेडिकल सेन्टरच्या प्रवक्त्यांनी ह्या वृत्ताची पुष्टी केली खरी, पण अधिक कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. महिलेने गोपनीयतेची अट घातल्यामुळे तिचे नाव उघड करण्यात आलेले नाही. बेलर मेडिकल सेंटर तर्फे दहा महिलांच्या गर्भाशायांचे ट्रान्सप्लांट करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. दहा पैकी चार महिलांच्या गर्भाशायांची ट्रान्सप्लांट्स झाली आहेत. ही ट्रान्सप्लांट्स २०१६ साली करण्यात आली होती. पण चार पैकी तीन महिलांच्या गर्भाशयांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा न झाल्यामुळे ही गर्भाशये पुन्हा काढण्यात आली होती.

तेव्हापासून आतापर्यंत आणखी किती ट्रान्सप्लांट करण्यात आली आहेत, याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. मेडिकल सेंटर मधील महिलेला गर्भाशयाचे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर मूल झाल्याची माहिती ‘टाइम’ या मॅगझिनने प्रसिद्ध केली होती, त्यामध्येच आणखी आठ गर्भाशयांचे ट्रान्सप्लांट झाल्याचे वृत्तदेखील प्रसिद्ध झाले होते. या आठपैकी एक महिला सध्या गर्भारशी असल्याचे समजते.

स्वीडन देशातील डॉक्टर मॅट्स ब्रानस्त्रोम यांनी सर्वप्रथम ट्रान्सप्लांट झालेल्या गर्भाशयाद्वारे पहिल्यांदा डिलिव्हरी करविली होती. गेल्या वर्षापर्यंत डॉक्टर ब्रानस्त्रोम यांनी, गर्भाशय ट्रान्सप्लांट करवून घेतलेल्या पाच महिलांच्या यशस्वी डिलिव्हरीज् केल्या असल्याचे समजते. आजवर जगभरात गर्भाशयाच्या ट्रान्सप्लांटच्या सोळा शस्त्रक्रिया झाल्याचे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment