तत्वचिंतनाचा कलाविष्कार: झेन वर्तन


कलेचा आविष्कार; अभिव्यक्तीच्या प्रक्रियेतील आनंद आणि रसिकांकडून मिळणारी दाद जेवढी निर्मितीचे समाधान देणारी आणि त्या निर्मितीसाठी महत्वाची आहे; तेवढीच त्या निर्मितीमागची प्रेरणाही महत्वाची आहे. ही प्रेरणा लौकिक कारणांपेक्षा आधिभौतिक असेल; त्याला तत्वचिंतनाची जोड असेल; तर ती निर्मिती प्रक्रिया ध्यानाचा आनंद देणारी ठरते; असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आणि झेन तत्वज्ञानाचे अनुयायी वर्तन यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना सांगितले.

वर्तन हे बरोडा स्कूलचे मास्टर ऑफ फाईन आर्ट्सचे पदवीधर. त्यानंतर ओशोंच्या सृजनशीलता;ध्यान या विषयावरील विचाराने प्रेरित होऊन ते पुण्याला आले. पुढे लाओ त्सु , गुरदजीफ , व इक्कायु याचे लेखन त्यांना भावले. झेन प्रवाहाची आवड निर्माण झाली. काही काळ त्यांनी मुंबई येथे वास्तव्य केले. आता ते पुण्यातील आपल्या स्टुडिओमध्ये चित्रकला आणि झेन तत्वचिंतन यात मग्न आहेत.

झेन हा शब्द मूलतः ध्यान यापासून निर्माण झाला. भगवान गौतम बुद्धांच्या काळात बौद्धधम्म जपानमध्ये गेल्यावर त्याचे रुपांतर चेन असे; तर चीनमध्ये ते झेन असे झाले. निसर्गाशी तादात्म्य साधून मनाच्या; जाणीवेच्या पुढे ध्यानाच्या अवस्थेत जाणे; भूतकाळाचे अथवा भविष्यकाळाचे संधान सोडून सहजभावाने वर्तमानात प्रत्येक क्षण त्रयस्थ भावाने अनुभवणे झेन मार्गात अपेक्षित आहे

झेन वर्तन गेली तीस वर्षे काम करतात. अमूर्त चित्राबद्धल ते म्हणतात; विश्वात; ढगात, पाण्यात, झाडात, सगळीकडेच आकार किंवा अमूर्तता दिसून येते. अर्थशून्य आकार दिसतात. उदाहरणार्थ झाडाच्या बुंध्यावर दिसणाऱ्या लयबद्ध रेषा; त्याचा आधार घेऊन अमूर्त चित्र हे घडू शकते. तथापि त्यांना अपेक्षित आहे मनाच्या; भौतिक जग आणि लौकिक विश्वाच्या पलीकडे जाऊन नजरेत भरून राहणाऱ्या; आकाराचे विघटन होऊन आकारशून्य प्रतले; नवी रंगसंगती – पोत – या सर्वांचे मिश्रण. त्या अवकाशाच्या पुढे जाऊन प्रतीत होणे. ही प्रक्रिया ते ध्यानाच्या समीप अवस्थेत गेल्यानंतर वर्तमानातील क्षण जणू चित्रात आणतात. हाच त्यांच्यासाठी त्या क्षणाचा उत्सव आहे. अर्थातच यातून चित्रपाहणाऱ्या मुमुक्षु अथवा जाणकार रसिकांना तितकाच नव्या विश्वाचाच, नेणिवेतीतलं प्रतिमांचा अनुभव व आनंद मिळतो.

Leave a Comment