मार्क झुकेरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग


वॉशिंग्टन – लॉस एन्जेलिसहून मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात आपला विनयभंग झाल्याचा दावा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची बहीण रँडी झुकेरबर्ग यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील माहिती बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

दरम्यान, रँडी झुकेरबर्ग यांचे प्रवाशाकडून विनयभंग होत असताना, ही घटना पाहिली नसल्याचा दावा अलास्का एअरलाईन्सच्या संबंधित विमानातील अटेंडेन्टने केला आहे. दरम्यान एअरलाईन्सने यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्याच्या यात्रेसंबंधित असलेले विशेषाधिकार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.

रँडी यांनी सिअ‍ॅटलमधील एअरलाइनच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, आपली शेजारी बसलेल्या व्यक्तीमुळे अत्यंत गैरसोय होत होती. कारण संबंधित व्यक्ती फर्स्ट क्लासमधील अन्य प्रवाशांवरही अश्लिल व अत्यंत खालच्या भाषेत टिप्पणी करत होता. तसेच त्याने माझ्या सहकर्मचाऱ्यांबाबतही आक्षेपार्ह विधाने केली. शिवाय विमानात येणाऱ्या महिला प्रवाशांबाबतही अश्लिल टिप्पणी करत होता.

फ्लाइट अटेंडेन्टकडे आपण संबंधित व्यक्तीची तक्रार देखील केली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच ही बाब खासगी प्रकारे न घेण्याचा सल्ला देत, आपल्याला फक्त जागा बदलून देण्यात आल्याची माहिती रँडी यांनी दिली. माझे शोषण केले जात असतानाही, मी माझी जागा सोडून दुसरीकडे का म्हणून जावे, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment