फेसबुकवर बायकोला जास्त लाईक मिळाल्यामुळे अत्‍याचार


दक्षिण अमेरिकेतील उरुग्‍वे देशातील एका महिलेला फेसबुकवर पोस्ट टाकणे महागात पडले आहे. तिच्या पोस्टला जास्त लाईक मिळाल्यामुळे तिच्या नवऱ्यानेच अत्‍याचार केल्याचे समोर आले आहे. हा संशयी नवरा प्रत्येक कॉमेंट आणि लाईकबद्दल बायकोला मारझोड करायचा आणि त्याने क्रूरतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या.

अॅडोल्फिना कॅमेली ऑर्टिगोजा असे या महिलेचे नाव असून तिचे वय 21 वर्षे आहे. तिच्या नवऱ्याचे नाव हेलियानो असे आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी तिला नवऱ्याच्या ताब्यातून मुक्त केले होते. त्यावेळी तिचा चेहरा ओळखणे कठीण झाले होते. शरीरावरची संपूर्ण त्वचा निघाली होती. अॅडोल्फिना हिचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असून त्यामुळेच ती फेसबुकवर आपले फोटो टाकते, असा संशय तिच्या नवऱ्याला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी या नवरोबाला अटक केली असून महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या गुन्ह्याबद्दल त्याला 30 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे हेलियानोच्या वडिलांनीच त्याच्या या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली.

फेसबुकवर तिच्या फोटोवर प्रतिसाद येताच हेलियानो हा हिंसक व्हायचा. तो तिच्या तोंडात कपडे कोंबून तिला मारहाण करायचा, असे अॅडोल्फिनाच्या वकिलांनी सांगितले.

Leave a Comment