सोशल मिडियाचा वापर करताना…


ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम ही सगळी सोशल मिडियाची साधने आपणा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. देश- विदेशातील हकीकती असोत, किंवा जगाच्या पाठीवर सगळीकडे असलेल्या आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांशी संपर्क साधणे असो, हे सर्व आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातूनच होत असते. एका रिसर्चच्या नुसार सर्वसाधारण व्यक्ती दिवसाचे चार ते पाच तास सोशल मिडियाचा वापर करीत असते. पण काही व्यक्तींना या माध्यमांचे अगदी ‘ अॅडिक्शन ‘ झालेले असते. अश्या व्यक्ती आपली तहानभूक सर्व काही विसरून केवळ सोशल मिडियाच्या माध्यमांमध्ये रमून जात असतात. अश्या व्यक्ती दिवसाचे सोळा ते अठरा तास देखील या माध्यमांच्या वापरामध्ये घालवितात. सोशल मिडीयामध्ये चर्चिल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयावर मत देण्याचा मोह या व्यक्तींना आवरता येत नाही, आणि ही सवय ‘ अॅडीक्शन ‘ कधी बनते, हे कळतच नाही. असे हे सोशल मिडियाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

कुठल्या ना कुठल्या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा मोह काही व्यक्तींना आवरता येत नाही, आणि आपली ही हाउस अश्या व्यक्ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून भागवून घेत असतात. असे करताना ते सोशल मिडीयाच्या आहारी कधी जातात, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. पण प्रत्येक बाबतीत मतप्रदर्शन करणे आवश्यक नाही. तुम्ही मांडत असलेल्या मतांमुळे तुमची प्रतिमा नकारात्मक होऊ शकते.

सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही घटनेवर विश्वास ठेऊन त्याबद्दलची माहिती पुढे ‘ शेअर ‘ करण्याआधी त्या गोष्टीची वास्तविकता पडताळून पाहणे गरजेचे आहे. पण कधी कधी प्रसिद्ध झालेली ही माहिती किंवा छायाचित्रे चुकीची असू शकतात. त्यामुळे अश्या छायाचित्रांवर किंवा माहिती बद्दल कोणतीही प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक द्या.

सोशल मिडियावरून एखादी माहिती किंवा घटना शेअर करीत असताना, किंवा त्यावर मतप्रदर्शन करीत असताना, त्या माहितीचा किंवा आपल्या मताचा आपल्या आसपासच्या लोकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण शेअर करीत असलेला कंटेंट आपल्याला कितीही चांगला वाटत असला, तरी तो इतरांना पटेल, किंवा रुचेल असे नाही. त्यामुळे असे कंटेंट शेअर करणे टाळा.

सोशल मिडीयाचा वापर एखाद्या व्यक्तीविषयी किंवा व्यक्तींच्या गटाविषयी किंवा एखाद्या विचारधारेविषयी नकारात्मक विचार पसरविण्यासाठीही केला जात असतो. आपण असल्या विचारांवर मतप्रदर्शन करणे टाळायला हवे.

Leave a Comment