ही दिल्लीमधील ठिकाणे आहेत झपाटलेली…!


आजकालच्या आधुनिक युगामध्ये भुतांच्या अस्तित्वावर लोकांचा फारसा विश्वास राहिलेला नाही. पण राजधानी दिल्ली येथील काही ठिकाणे अशी आहेत, जिथे अनेकांना अनेक चित्रविचित्र अनुभव आले आहेत. आता येथे खरेच भुतांचा वास आहे की नाही, हे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नसले, तरी लोकांनी या ठिकाणी घेतलेले अनुभव इतके विचित्र आहेत, की त्यांना हे अनुभव का आले असावेत, किंवा अश्या घटना घडण्यामागे कोणते कारण असावे, या प्रश्नांचे समाधान आजतागायत कोणी करु शकलेले नाही. त्यामुळे ज्या लोकांच्या बाबतीत या घटना घडल्या, त्यांना त्या ठिकाणी कोणत्यातरी नकारात्मक शक्तीचा वास असल्याची खात्री पटली. आणि ज्यांना या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांनी केवळ कुतूहल म्हणून या बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्लीमधील कँटोनमेंट परिसरात अनेक लोकांना चित्रविचित्र अनुभव आल्याचे बोलले जाते. असे म्हणतात, की या भागामध्ये एका स्त्रीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिचे अस्तित्व आजतागायत अनेक लोकांना जाणविले आहे. या परिसरामधून येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यांच्या मागे ही स्त्री धावत असल्याची वदंता असून, जर चालकाने गाडी थांबविली तर ही स्त्री अदृश्य होते असे ही म्हटले जाते. मात्र दिल्ली कँटोनमेंट परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना असे अनुभव कधी आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे इथे खरेच असे काही घडते, की ही कोणाची कल्पित कहाणी आहे, हे कळण्यास मार्ग नाही. पण हा परिसर ‘ झपाटलेला ‘ समजला जातो, इतके मात्र निश्चित.

दिल्लीमधील मेहरोली भागामध्ये असलेली जमाली कमाली मशीद ही देखील झपाटलेली वास्तू समजली जाते. येथे इस्लामी सुफी संत जमाली आणि कमाली यांचे दर्गे आहेत. या दर्ग्यांच्या जवळ गेल्यास अनेक चित्रविचित्र आवाज येत असल्याचे बोलले जाते. असे म्हणतात, की इथे जो येतो, त्यांच्याशी हे संत बोलण्याचा प्रयत्न करीत असतात. येथे संध्याकाळनंतर फारसे कोणी दृष्टीस पडत नाही, ते बहुदा याच कथांच्या प्रभावामुळे असावे.

दिल्लीमधील द्वारका भागाच्या सेक्टर ९ मध्ये असलेल्या मेट्रो स्टेशनजवळही अनेकांना चित्रविचित्र अनुभव आलेले आहेत. इथे ही लोकांना त्यांच्या गाडीच्या वेगाबरोबर धावणारी स्त्री दृष्टीस पडत असल्याचे बोलले जाते. तसेच इथून ये-जा करणाऱ्या अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना देखील घडल्या असून, मारहाण करणारी व्यक्ती कोण होती हे कधीही कोणीही पाहिलेले नसल्याचे समजते. अर्थात या घटना घडण्यामागे कुठल्या नकारात्मक शक्तीचा हात असावा, याचा कोणता ही पुरावा आजवर सापडलेला नाही.

दिल्लीमधील वसंतकुंज भागामध्ये जवळ जवळ दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये संजय वन हा वनराईचा भाग आहे. या परीसारामध्ये अनेक सुफी संतांच्या मजार असून, इथे लहान मुलांचे रडण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू येतात असे लोकांचे म्हणणे आहे. संजय वनच्या आसपासचा परिसर हा भर वस्तीचा परिसर असून, आजवर तेथील लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतल्याचे ऐकीवात नाही, पण काही लोकांनी याचा अनुभव घेतला असल्याचे बोलले जाते.

दिल्लीमधील रोहिणी परिसरात नदी आहे, जिला ‘ खूनी नदी ‘ म्हटले जाते. आता या नदीच्या नावावरूनच येथे काय घटना घडून गेल्या असतील, याची कल्पना करणे तितकेसे अवघड नाही. असे म्हणतात, की या नदीच्या पाण्यामध्ये काहीतरी अद्भुत शक्ती आहे, ज्यामुळे या नदीमध्ये पोहोण्यास गेलेल्या व्यक्ती त्या नदीतून बाहेर येऊ शकत नाहीत, आणि त्यांचे पुढे काय झाले, याचा ही थांगपत्ता लागत नाही. अनेक व्यक्तींचा या नदीच्या परिसरात मृत्यू झाला हे जरी खरे असले, तरी त्यामागे नेमकी कारणे अजून स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे हा ही परिसर ‘ झपाटलेला ‘ समजला जातो.

Leave a Comment