काही देशांमधील काही विशेष तथ्ये


परदेश गमनाची, तेथील संस्कृती, परंपरा जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. तेथील चाली-रिती, इतिहास, याबद्दल आपल्याला कुतूहलही असते. पण काही देशांमध्ये काही परंपरा अश्या आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकून किंवा वाचून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या परंपरांचा संबंध तेथील तंत्रज्ञान, कायदेव्यवस्था, पर्यावरण या सर्वांशी निगडीत आहेत.

ऑस्ट्रलिया या देशाला उदंड सागरकिनारा लाभला आहे. याचा उपयोग या देशाने वीजनिर्मिती करिता केला आहे. या सिस्टम ला CETO 5 असे नाव दिले गेले आहे. समुद्राच्या लहरींनी चालविले जाणारे असे हे पावर जेनरेटर्स संपूर्ण ऑस्ट्रलियाला ‘ झिरो एमिशन ‘ वीज पुरवठा करीत आहेत. तसेच समुद्राचे खारे पाणी पिण्यासाठी योग्य बनविण्याचे काम ही या सिस्टमद्वारे केले जात आहे.

जपानमधील सर्व सरकारी इस्पितळांची व्यवस्था डॉक्टर्स पाहत असतात. ही सर्व इस्पितळे ‘ ना नफा न तोटा ‘ या तत्वावर कार्यरत आहेत. त्यामुळे ‘ नफा ‘ हे एकमेव ध्येय असलेल्या कॉर्पोरेट कंपनी इथल्या इस्पितळांमध्ये नसल्याने उपचाराची अवाजवी किंमत रुग्णाला द्यावी लागत नाही. जपान मधील रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या सरकारी नोकरदार रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी तीस टक्के रक्कम भरावी लागते, तर उरलेली सत्तर टक्के रक्कम सरकार खर्च करीत असते. खासगी मेडिकल उपचारांचे खर्च विम्याद्वारे केले जातात.

स्वीडन या देशामध्ये महिलांना भरघोस ‘ मॅटर्निटी लीव्ह ‘ दिली जाते. येथील नागरिक असणाऱ्या महिलांना त्यांच्या पगाराच्या एकूण ऐंशी टक्के रक्कम दर महिना देण्यात येऊन तब्बल ५६ आठवड्यांपर्यंत मॅटर्निटी लीव्ह देण्यात येते. आवश्यकतेनुसार त्यांनतर अतिरिक्त तेरा आठवड्यांपर्यंत ही सुट्टी वाढविता येऊ शकते. या अतिरिक्त सुट्ट्यांच्या दरम्यान ठराविक रक्कम पगारादाखल महिलांना दिली जाते.

उत्तर कोरियाच्या नागरिकांनी केस कसे कापून घ्यायचे याचे ही नियम आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारने अठ्ठावीस हेअरकटना मंजुरी दिलेली आहे. या पैकी दहा हेअरकट पुरुषांसाठीचे असून या हेअरकट पैकी एक हेअरकट पुरुषांनी निवडायचा असतो. त्या मानाने महिलांना थोडी अधिक मुभा देण्यात आली असून, त्यांच्यासाठी अठरा हेअरकट निश्चित करण्यात आले आहेत. ह्या हेअरस्टाईल्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धातीने केस कापून घेण्यास इथे मनाई आहे.

डेन्मार्क देशामध्ये नवजात बाळाचे नाव ठेवताना सरकारमान्य सात हजार नावांमधून नावांचे चयन करावे लागते. ह्या यादीमधील बहुतांशी नावे पाश्चिमात्य, युरोपियन असून मुलांसाठी तीन हजार, तर मुलांसाठी चार हजार नावे या यादीमध्ये दिलेली आहेत. ह्या यादीमध्ये असणाऱ्या नावांपेक्षा निराळे नाव जर एखाद्या नवजात अर्भकाचे ठेवायचे असेल तर पालकांना स्थानिक चर्चकडून तशी परवानगी घ्यावी लागते. हा कायदा केवळ डेन्मार्कच्या नागरिकांना लागू आहे.

पॅसीफिक महासागरात केवळ बाराशे लोक राहत असणारे न्यूए नामक बेट बाकीच्या जगापासून काहीसे अलिप्तच आहे. त्यातल्या त्यात ह्या बेटाचे न्यूझीलंड देशाशी जवळचे संबंध आहेत. न्यूए बेटावर प्रचलित असलेले चलन देखील न्यूझीलंड मधील टाकसाळीतून तयार होऊन येत असते. गंमत अशी की इथे २०१४ साली चलनात आणलेल्या नाण्यांवर डिझनीतील, स्टार वॉर्स, पोकेमॉन ही पात्रे आहेत. एका नाण्याची किंमत अमेरिकन चलनानुसार पंचवीस डॉलर्स इतकी आहे. न्यूए येथील दुर्मिळ सोन्याच्या नाण्याची किंमत चाळीस हजार डॉलर्स इतकी आहे.