एक रुपयाच्या नोटेची शंभरी ..


भारतीय चलनात आता दुर्मिळ झालेल्या एक रुपायाच्या नोटेने नुकतीच शंभरी ओलांडली आहे. पहिल्या प्रथम तयार झालेल्या एक रुपयाच्या नोटेची छपाई इंग्लंड मध्ये झाली, आणि तीस नोव्हेंबर १९१७ रोजी ही नोट चलनात आणली गेली. तेव्हा या नोटेवर इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज यांचे मुखचित्र नोटेच्या डाव्या कोपऱ्यामध्ये होते. ही नोट चलनामध्ये येण्यापूर्वी भारतामध्ये एक रुपयाचे चलन १८६१ सालापासून होते. युद्धासाठी आवश्यक ती हत्यारे निर्माण करण्यासाठी ही नाणी वितळवून त्यातील चांदी काढून घेण्यात आली होती. त्यामुळे नवी एक रुपयाची नोट १९१७ साली पुन्हा चलनात आणली गेली.

१९१७ साली चलनात आणली गेल्या नंतर एक रुपयाच्या नोटेची किंमत १०.७ ग्राम वजनाच्या चांदीइतकी होती. सध्याच्या काळामध्ये चांदीची किमंत लक्षात घेता, एक रुपयाची त्या काळातील किंमत आताच्या काळामध्ये चारशे पटीने घटली आहे. त्या काळी लोकांना एक ते चार रुपये वेतन मिळत असे.

एक रुपयाची नाणी अजूनही चलनात असली, तरी एक रुपयाची नोट मात्र दुर्मिळ झाली आहे. पण सणासुदीच्या दरम्यान या एक रुपयाच्या नोटा आवर्जून दिसतात. पूजेमध्ये ठेवण्यासाठी किंवा लग्नामध्ये नवरदेवासाठी बनविलेल्या नोटांच्या माळेमध्ये एक रुपयाच्या नोटेचे दर्शन आवर्जून होत असते. मिन्टेजवर्ल्ड.कॉम हे चलनातील निरनिराळी नाणी आणि नोटांचे ऑनलाईन संग्रहालय आहे. इथून देण्यात आलेल्या माहितीनुसार सणासुदीच्या दिवसांमध्ये एक रुपयाच्या शंभर नोटांच्या गठ्ठ्याची किंमत साधारण पंधरा हजार रुपयांपर्यंत असते. एक रुपयाच्या नाण्यांऐवजी नोटांनाच लोकांकडून जास्त मागणी असल्याचे या संग्रहालायाच्या प्रमुखांनी सांगितले. १९१७ साली चलनात आलेल्या एक रुपयाच्या नोटेला आता फारशी किंमत नसली, तरी ऐतिहासिक दृष्ट्या याचे महत्व नक्कीच मोठे आहे.

Leave a Comment