अबब! बिटकॉईन पहिल्यांदाच बनले 6.5 लाख रुपयांपेक्षा महाग


आंतरजालावरील व्हर्च्युअल चलन असलेल्या बिटकॉईनने पहिल्यांदाच 10 हजार डॉलरची ( 6.5 लाख रुपये) किंमत पार केली आहे. बिटस्टॅम्प या डिजिटल एक्सचेंजवर बुधवारी सकाळी 11.30 वाजता बिटकॉईनची किंमत 10,115 डॉलर एवढी होती. एका वर्षाच्या आत बिटकॉईनची किंमत 10 पटीने वाढली आहे.

सीएमई समूह आणि शिकागो बोर्ड ऑप्शन्स एक्सचेंज या शेयर बाजाराने या महिन्यात बिटकॉईन फ्यूचर्स आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या महिन्यात बिटकॉईनच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सीएमई समुहाने 31 ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली होती. त्यानंतर लगेच बिटकॉईनची किंमत पहिल्यांदा 7,000 डॉलर (4.52 लाख रुपये) या पातळीवर गेली होती. त्यानंतर शिकागो बोर्ड ऑप्शन्स एक्सचेंजने 17 नोव्हेंबर रोजी योजना जाहीर केली होती.

यापूर्वी बिटकॉईनचा वापर गुन्हेगारांकडून केला जाण्याची भीती होती. मात्र गुंतवणूकदारांनी आता ही भीती दूर केली आहे, असे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘आता आमच्याकडे लाखों सक्रिय वापरकर्ते आहेत, तर गेल्या वर्षी एक लाखही नव्हते,’ असे बिटकॉईनच्या व्यापाराशी संबंधित संकेतस्थळ ब्लॉकचेन डॉट इन्फोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर स्मिथ म्हणाले.

नोव्हेंबर 2010 मध्ये एका बिटकॉईनची किंमत फक्त 0.22 डॉलर एवढी होती. सध्या जगभरात बिटकॉईनची संख्या 1.7 कोटी एवढी असून त्यांची एकूण किंमत 10.32 लाख कोटी रुपये आहे, असे मानले जाते. मात्र भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने बिटकॉईनला मान्यता दिलेली नाही.

Leave a Comment