पुढच्या वर्षी इंटरनेटवर सावधच राहा – शास्त्रज्ञ


ऑनलाईन सुरक्षेच्या दृष्टीने 2018 हे वर्ष धोकादायक ठरू शकते. नवीन रणनीती आणि बिझिनेस मॉडेलचा वापर करून हॅकर्स उपकरणांवर थेट हल्ला करू शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

“जगात खळबळ माजविणारा 2017 सालातील रॅन्समवेयर हा केवळ एक नमुना होता. हॅकर्स 2018 सालात याहून धोकादायक धोरणे आणि बिझिनेस मॉडेलसह येऊ शकतात,” असे मॅकएफे या इंटरनेट सुरक्षा कंपनीने म्हटले आहे. हॅकर्स हे श्रीमंत लोकांना लक्ष्य करू शकतात आणि संगणक किंवा स्मार्टफोनपेक्षा कमी सुरक्षित असलेली उपकरणे हे त्यांचे लक्ष्य असेल, असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. थ्रेट्स प्रेडिक्शन रिपोर्ट असे या अहवालाचे नाव आहे.

असे हल्ले करण्यासाठी हॅकर्स अन्य लोकांना नियुक्त करतील, असे सायबर हल्ल्यांच्या वाढत्या नेटवर्ककडे पाहून वाटते, असे मॅकएफेचे चीफ सायंटिस्ट राज समानी यांनी मत व्यक्त केले. “हॅकिंग सेवांना कमर्शियल बनविणे किती सोपे आहे, हे 2017 साली सिद्ध झाले. अशा हॅकिंग सेवा विरोधी गटांना विकून जगात कुठेही राजकारण, व्यापार किंवा अन्य क्षेत्रांना प्रभावित केले जाऊ शकते,” असे ते म्हणाले.

Leave a Comment