बीएसएफ जवान मृत्यूनंतरही देणार जीवनदान


बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या मृत्यूनंतरही देशवासियांना जीवनदान देण्याचे काम करणार आहेत. या निमलष्करी दलातील ७० हजार जवान, अधिकार्‍यांनी मृत्यूनंतर अथवा ब्रेन डेडची समस्या आल्यास अवयवदान करण्याची शपथ घेतली आहे. यामुळे या जवानांना वेळेअगोदर मृत्यू आला अथवा मेंदू निकामी झाला असेल तर त्यांच्या शरीरातील अवयवांचे प्रत्यारोपण गरजू रूग्णांवर केले जाणार असून त्यामुळे त्या रूग्णांना जीवनदान मिळू शकणार आहे.

भारतात अवयव दान जागृती फारशी झालेली नाही. आत्तापर्यंत केवळ ०.८ नागरिकांनी अवयवदानासाठी फॉर्म भरले आहेत. बीएसएफचे प्रमुख के.के. शर्मा म्हणाले आमच्याकडे असलेल्या २.६५ लाख जवान व अधिकार्‍यांकडे प्रामुख्याने पाकिस्तान व बांग्ला देशाला लागून असलेल्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. आमच्यामधील ७० हजार जणांनी अयवयदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात निवृत्त कर्मचारीही सहभागी झाले आहेत. ब्रेन डेड झाल्यास अथवा अचानक मृत्यू आल्यास मूत्रपिंडे, फुफ्पूसे, यकृत, डोळे, आतडी, पॅन्क्रीयाज, हाडे यांचा वापर गरजूंसाठी करण्यात येईल. यातून अनेकांना जीवनदान मिळू शकेल.

भारतात दरवर्षी ५ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात व प्रत्यक्षात मागणी पावणेदोन लाख असते. तसेच यकृत प्रत्यारोपणाच्या वर्षाला १ हजार शस्त्रक्रिया होतात पण प्रत्यक्षात मागणी ५० हजारांची आहे असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment