पीएफ व्याज दरात कपात होण्याची शक्यता


नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट असणाऱ्या नोकरदार वर्गाला सरकार एक झटका देऊ शकते. कारण, पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. ईपीएफओने गेल्या २०१६-१७ या वर्षात ८.६५ टक्के व्याजदर देण्याचे घोषित केले होते. पण या व्याजदरात चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये कपात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत ईपीएफओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याजदरात कपात करण्यासंदर्भात एक अहवाल श्रम मंत्रालयाकडून तयार केला आहे. प्रामुख्याने दोन कारणांमुळे व्याज दरात घट करण्यात येणार आहे. पहिले कारण म्हणजे ईपीएफ खात्यात ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) यूनिट थेट जमा करण्यात येईल. दुसरे कारण म्हणजे, ईपीएफओला गुंतवणुकीत होणाऱ्या मिळकतीत सलग घट होत असल्यामुळे सध्याचा दर कायम राखणे कठीण होत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या एकूण उत्पन्नाचा अंदाज कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने लावला नाही. ईपीएफओ याच उत्पनाच्या आधारे व्याजदर ठरवते. पण सूत्रांच्या मते यावेळीचा व्याजदर यापूर्वीच ठरवण्यात आला होता. जर चालु आर्थिक वर्षातही व्याज दरात कपात झाली तर व्याजदर स्थिर ठेवणे कठीण होईल. त्यामुळे व्याजदरात कपात होऊन ८.३० टक्के केला जाऊ शकतो.

Leave a Comment