अशी घ्या आपल्या आभूषणांची काळजी


दागिने मूल्यवान असोत, किंवा कोणत्याही प्रकारची फॅशन किंवा कॉस्च्युम ज्वेलरी असो, यांची योग्य निगा राखणे आवश्यक असते. जर यांची योग्य निगा राखली, तर हे दागिने नेहमी नव्यासारखे चमकत राहतात, अन्यथा अगदी मूल्यवान सोन्याचे किंवा हिऱ्याचे एखादे आभूषण देखील निस्तेज दिसला लागते. त्यामुळे दागिने वापरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

फॅशन ज्वेलरी किंवा कॉस्च्युम ज्वेलरीचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. तसेच ही दागिने साफ करताना कोणत्याही प्रकारचे अॅसिड, अल्कोहोल, व्हिनेगर, किंवा अमोनिया युक्त वस्तूंचा वापर टाळायला हवा. या सर्व वस्तूंमुळे नकली दागिन्यांवरील पॉलिश खराब होऊन दागिने निस्तेज दिसू लागतात. तसेच या दागिन्यांचा वापर करताना कोणत्याही प्रकारची क्रीम्स, लोशन्स, रासायनिक प्रसाधने, परफ्युम्स, तेल या गोष्टींपासून दागिने लांब ठेवावेत. या करिता एक लहानशी टिप अशी, की आपला मेकअप पूर्ण झाल्यानंतरच दागिने अंगावर घालावेत. आधी दागिने घालून मग क्रीम्स, किंवा परफ्युम्स वापरण्याचे टाळावे. पितळे, तांबे किंवा ब्रॉन्झ वापरून तयार केलेले दागिने परफ्युम्स, किंवा क्रीम्स्च्या संपर्कात आल्याने ‘ ऑक्सिडाइझ ‘ होऊन निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे हे दागिने घालताना देखील मेकअप आधी करावा, आणि एकदा मेकअप सेट झाल्यावरच दागिने घालावेत.

फॅशन ज्वेलरी किंवा कॉस्च्यूम ज्वेलरी साफ करण्याकरिता एखाद्या अतिशय मऊ कपड्याचा वापर करायला हवा. या साठी सुती मलमलचा कपडा उत्तम. या कपड्याने हलक्या हाताने हे दागिने साफ करावेत. दागिन्यांच्या सफाईसाठी कोणत्याही साबणाचा किंवा व्हिनेगर, अल्कोहोल असल्या पदार्थांचा वापर कटाक्षाने टाळायला हवा. तसेच दागिने वापरून झाल्यानंतर स्वच्छ पुसून एखाद्या सुती पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या ‘ झिप लॉक ‘ पिशवीत ठेवा. फॅशन नेकलेस पेटीमध्ये न ठेवता एखाद्या हुकला टांगून ठेवा. नेकलेस किंवा इयररिंग्स एकत्र डब्यामध्ये ठेवली, तर ती एकमेकांत गुंतून तुटण्याचा संभव असतो. त्यामुळे हे सेट्स वेगवेगळ्या पिशव्यांमधून भरून ठेवा.

सोन्याचे किंवा रत्नांचे अलंकार साफ करणे तितकेसे अवघड नसते. पण दररोज वापरत असल्याने या दागिन्यांमध्ये ही शरीरावरील मळ, किंवा घाम साठत असतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी या दागिन्यांची सफाई करणे आवश्यक आहे. या करिता कोमट पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू घालून त्या मिश्रणात हे दागिने काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर हलक्या हाताने, एखाद्या जुन्या टूथब्रशने हे दागिने घासावेत, आणि मग साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. दागिने धुवून झाल्यानंतर लगेच मऊ कपड्याने पुसून कोरडे करावेत.

सोन्याचे दागिने चमकविण्याकरिता एका भांड्यामध्ये थोडे पाणी उकळून त्यामध्ये किंचित हळद घालावी, व या मिश्रणत दागिने काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर दागिने हळदीच्या पाण्यातून काढून घेऊन, स्वच्छ पाण्याने धुवावेत, व पुसून कोरडे करावेत. शुद्ध चांदीचे दागिने ( पैंजण, कडे वगैरे )स्वच्छ करायचे असल्यास एका भांड्याच्या तळाशी अॅल्युमिनियम फॉईल लावा, त्यामध्ये पाणी घाला, व त्या पाण्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला. हे पाणी उकळून घेऊन त्यामध्ये चांदीचे दागिने काही काळ ठेवा. या मिश्रणाने चांदीच्या दागिन्यांवर आलेला काळसरपणा दूर होऊन दागिने नव्याप्रमाणे चमकू लागतील. दागिने स्वच्छ झाले की मऊ कपडयाने पुसून कोरडे करावेत.

Leave a Comment