आता घटस्फोटासंदर्भात माहिती देणार डायव्होर्सकार्ट अ‍ॅप


घटस्फोट हा सध्या देशातील सर्वात चिंताजनक विषय बनला आहे. याचे जवळपास प्रत्येक समाजात प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. एखाद्या दाम्पत्याला घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याला वकिलाकडे जाऊन कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याशिवाय सध्या तरी कोणताही पर्याय नाही. पण आजच्या डिजीटल आधुनिक युगात सर्व काही घटक स्मार्ट होत असताना घटस्फोटही याला अपवाद कसा राहणार ? वंदना शहा या विख्यात महिला विधिज्ज्ञाने नेमकी हीच बाब लक्षात घेत डायव्होर्सकार्ट या नावाने स्वतंत्र अ‍ॅप सादर केले आहे.

घटस्फोटात स्पेशालिटी असणार्‍या वकील म्हणून शहा याओळखल्या जातात. त्या वेळोवेळी वर्तमानपत्रांमधील लेखांच्या माध्यमातून घटस्फोटाबाबत माहितीसुद्धा देत असतात. पण त्यांच्या अ‍ॅपमुळे त्या थेट घटस्फोट घेऊ इच्छुक असणार्‍या स्त्री-पुरूषांना त्यांच्या स्मार्टफोनवरच याबाबत थेट सखोल मार्गदर्शन करणार आहेत. यात घटस्फोटाबाबत विद्यमान कायदेशीर तरतुदींसह संबंधित व्यक्तीच्या अधिकारांच्या माहितीचा समावेश आहे.

घटस्फोट घेण्यासाठी क्रमाक्रमाने नेमके काय करावे? याची माहिती यातून कुणालाही देण्यात येणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी हे अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. यातील माहिती ही सध्या तरी इंग्रजीतून असून यात लवकरच अन्य भाषांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नुकतेच हे अ‍ॅप वंदना शहा यांनी सादर केले. स्वत:च्या आयुष्यात घटस्फोटांना सामोरे जावे लागणारे अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कुणालाही अगदी २४*७ या प्रकारात याच्या माध्यमातून मोफत माहिती देण्यात येणार आहे. ज्येष्ठ विधिज्ज्ञांकडून रिअल टाईम या पद्धतीत मिळणार्‍या मार्गदर्शनाचा यात समावेश आहे. तथापि हे अ‍ॅप फक्त मार्गदर्शन करणारे असून यातून संबंधीत जोडप्यांना माहिती मिळवून प्रत्यक्षात न्यायालयात जाण्याची प्रक्रिया स्वत:लाच करावी लागणार असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. हे अ‍ॅप याआधी घटस्फोट प्रक्रियेतील सर्व बारकावे संबंधीतांना सांगणार आहे.

Leave a Comment