कर्करोगाविषयी जागरुकता आवश्यक


आजच्या आधुनिक युगामध्ये कर्करोगावर उपचार अस्तित्वात असले, तरी या रोगाने दरवर्षी जगभरामध्ये हजारो रुग्ण प्राणांना मुकत असतात. कर्करोग होण्यापाठीमागे काही ठाम कारणे देता येत असली नसली तरी आजकालची बदलती जीवनशैली, खानपानाच्या पद्धती, काही ठराविक व्यवसाय, ठराविक सवयी, अस्वछ वातावारणामुळे उद्भवणारी इन्फेक्शन, निसर्गातील प्रदूषण, अतिप्रमाणात हार्मोन्स शरीरामध्ये घेणे, आणि लठ्ठपणा काही अंशी कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे कर्करोग आणि रुग्णाचे वय यातही काही अंशी संबंध आहे. कर्करोग हा तरुण वयाच्या रुग्णामध्ये फार जलद गतीने फैलावतो, तर उतारवयात झालेला कर्करोग रुग्णाच्या शरीरामध्ये अतिशय संथ गतीने फैलावत असतो. बहुदा त्यामुळे कर्करोगाचे निदान ही वेळेवर होऊ शकत नाही.

आपल्या शरीरातील ` डीएनए ‘ मध्ये काही कारणाने परिवर्तन ( mutation ) होऊन त्याद्वारे कर्करोग शरीरातील जीन्समध्ये उद्भवतो. अॅल्युमिनियम, अॅसबेस्टॉस, तंबाखू, इत्यादी उत्पादित केल्या जाणाऱ्या कारखान्यातील कामगारांना कर्करोग होण्याची शक्यता असते. असेच ज्यांचा रेडियम, लाकडाचा भुसा, रेडियो न्युक्लाईड्स शी नियमित संपर्क येतो, अश्याही व्यक्तींना फुफ्फुसाचा, मेंदूचा किंवा मणक्याचा कर्करोग होण्याची शक्यता असते. आजाकालच्या खानपानाच्या सवयी बदलत असल्याने सध्या प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शरीराला मिळणारे पोषण अपुरे राहत आहेच, शिवाय एअर कान्डिशंन्ड ऑफिसेस मधेच सतत काम करणाऱ्या व्यक्तींना ताजा प्राणवायू कमी मिळत असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही कमी होत चाललेली आढळत आहे. त्यामुळे गंभीर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे.

अनेक प्रकारच्या व्हायरस मुळे शरीरात कर्करोग उद्भवत असतो. एचपीव्ही नामक व्हायरस मुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो, तर हेलीकोबॅक्टर पायलोरी मुळे अल्सर, आणि पचनसंस्थेच्या अवयवांचे कॅन्सर उद्भवतात. हेपाटायटीस बी आणि सी मुळे लीव्हर चा कॅन्सर होण्याची शक्यता असते, तर अल्ट्रा व्हायोलेट किरणाच्या सततच्या संपर्कामुळे किंवा कडक उन्हामध्ये सतत राहिल्याने त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. संतती होण्याकरिता घेतल्या जाणाऱ्या उपचारांच्या माध्यमातून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन हे हार्मोन्स जास्त काळ घेतल्याने देखील महिलांना स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच न्युक्लीयर पावर प्लांट मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, कॅन्सरसाठी केमोथेरपी आणि रेडियेशन दिल्या गेलेल्या व्यक्ती, यांनाही कर्करोग होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणामध्ये सौंदर्यप्रसाधनांचा वापर, खाण्याचे रंग, किंवा फळे, भाज्या पिकविणाऱ्या रसायानांमुळे कर्करोग होऊ शकतो.

आपण आपल्या नित्याचा आयुष्यामध्ये काही बाबतीत काळजी घेतली पाहिजे असे कर्करोगतज्ञ म्हणतात. हेपाटायटीस न व्हावा यासाठी उपलब्ध असणारे लसीकरण करवून घेणे, फळे व भाज्या बाजारातून आणल्यानंतर मीठाच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेणे, महिलांनी वेळोवेळी स्तनाच्या कर्करोगासाठी सेल्फ एक्झामिनेशन करणे, पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सरच्या निदानासाठी पीएसए टेस्ट वेळोवेळी करविणे, धूम्रपान व मद्यपानाचे सेवन टाळणे इत्यादी गोष्टींचा अवलंब आपण करायला हवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment