जगातील सर्वात सुंदर विमानतळ


कुठल्या ही गोष्टीची पहिली छाप अतिशय महत्वाची असते. त्याचप्रमाणे विमान प्रवास करावयाच्या हेतूने जेव्हा आपण विमानतळावर येतो, तेव्हा तिथले वातावरण, सोयी हे सर्व पाहून त्या विमानतळाबद्दल आपले अनुकूल किंवा प्रतिकूल मत बनत असते. जगातील काही विमानतळ हे सर्व अद्ययावत सुखसोयींनी परिपूर्ण तर आहेतच, त्याशिवाय ‘ इंडस्ट्रीयल डिझाईन्स ‘ चे उत्तम उदाहरण देखील आहेत.

न्यूझीलंड येथील वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल न्यूझीलंडच्या सर्वात प्राचीन वस्तूविशेषावरून प्रेरणा घेत तयार करण्यात आले आहे. सर्वसाधारण विमानतळ जसे दिसतात, तसा हा विमानतळ दिसत नसून ‘ द रॉक ‘ म्हणून ओळखले जाणारे हे टर्मिनल जमिनीतून वर आलेल्या एखाद्या अजस्त्र खडकाप्रमाणे दिसते. या विमानतळाचा बाहेरील भाग काहीसा असमान असून तांब्याने बनविलेला आहे. विमानतळाच्या आतले इंटिरियर खूपच सुंदर आणि प्रशस्त असून, हे बनविण्यासाठी उत्तम प्रतीच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे.

एका मैलाच्या विस्तारामध्ये पसरलेल्या जपान मधील कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ हे जगातील सर्वात मोठे म्हणून ओळखले जाते. हे टर्मिनल पूर्णतः काचेचा वापर करीत बनविले गेले असल्याने प्रवाश्यांना एअरपोर्टचा सुंदर व्ह्यू अखंड दृष्टीस पडत राहतो. हा विमानतळ ओसकाच्या किनारपट्टीपासून तीन मैलांच्या अंतरावर एका मानवनिर्मित बेटावर बनविण्यात आला आहे. या बेटावरून शहराकडे जाण्या-येण्यासाठी एक सस्पेन्शन ब्रिज बनविण्यात आला आहे.

शेंझेन बाओआन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आकार असा आहे, की तो पाहून एखादा महाकाय प्राणी पहिल्याचा भास होतो. चीन मध्ये असलेला हा विमानतळ, चीनच्या किनारपट्टीवर नेहमी दृष्टीस पडणाऱ्या मंता रे नावाच्या माश्याच्या आकाराप्रमाणे दिसतो. या विमानतळाचे आतील स्ट्रक्चर एखाद्या मधाच्या पोळ्याप्रमाणे दिसते. ह्या विमानतळामध्ये आता लवकरच आणखी नवीन इमारतींचे काम सुरु करण्यात येणार आहे.

मुंबई शहराच्या विस्ताराला साजेसाच आहे तिथला भव्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, व त्याचे नव्यानेच बनविले गेलेले टर्मिनल २. ह्या विमानतळाचे नवे टर्मिनल सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असून, अतिशय प्रशस्त आहे. इथे भारतीय तसेच परदेशी प्रवाश्यांच्या सोयींचा विचार करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तिबेट मधील दाओचेंग विमानतळ हा जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेला विमानतळ आहे. इथे विमान उतरविण्यामध्ये, किंवा उड्डाण करण्यामध्ये वैमानिकाचे सारे कसब पणाला लागते. हा विमानतळ डोंगरांनी वेढलेला असून, येथून चौफेर दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक आहे. इथे येणाऱ्या काही प्रवाश्यांना त्या उंचीचा त्रास होऊ शकतो. या विमानतळाच्या इमारतीचा आकार बौद्ध भिक्षुक वापरत असलेल्या ‘ खाता ‘ स्कार्फ ला मारलेल्या गाठीप्रमाणे दिसतो.

Leave a Comment