या ‘हॅकर्स‘नी उडवली होती नासाची झोप


कॉम्युटर अस्तित्वात आला आणि माणसाचे आयुष्यच पार बदलून गेले. आता कॉम्युटर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहीला आहे. घरे, ऑफिसेस, बँका, दुकाने .. कुठेही जा, आता कॉम्प्युटर शिवाय पर्याय राहिलेला नाही. एकीकडे कॉम्प्युटर ने आपले आयुष्य सोपे केले असले, तरी काही बाबतीत हा शाप ठरला आहे. याचे कारण म्हणजे ‘ हॅकिंग ‘. कुठल्याही व्यक्तीशी, किंवा संस्थेशी निगडीत कॉम्प्युटर वर सेव्ह केलेली माहिती, त्याच्या परवानगीशिवाय वापरून त्याचा दुरुपयोग करण्याला ‘ हॅकिंग’ असे म्हटले गेले आहे. अगदी फेसबुक अकाऊंट पासून ते मोठमोठ्या गुप्त प्रोजेक्ट्स पर्यंत सर्व काही ‘ हॅक ‘ करता येऊ लागले आहे. ‘ हॅकिंग ‘ करण्यासाठी कुख्यात असलेले असे काही हॅकर्स आहेत, जे नासा सारख्या संस्थांची देखील डोकेदुखी बनून राहिले आहेत.

जोनाथन जेम्स ह्या हॅकर ने नासाच्या नाकी नऊ आणले. न्यूयॉर्क टाइम्स मधील बातमीनुसार जोनाथन ने कॉम्प्युटरच्या मदतीने अमेरिकन सरकार चा डेटाबेस हॅक करीत नासाच्या नेटवर्क वरून स्पेस स्टेशनच्या कार्यप्रणाली बद्दल सर्व माहिती हस्तगत केली. त्याच्या या प्रतापामुळे नासाला आपले नेटवर्क तब्बल तीन आठवडे बंद ठेवावे लागले. जेम्स वर सरकारी डेटाबेस हॅक केल्याचे अन्य कितीतरी आरोप लावले गेले, पण हे सर्व आरोप त्याने नाकारले.

रायन कॉलिन्स हा सर्वात खतरनाक हॅकर समजला जातो. ह्या पठ्ठ्याने अभिनेत्री जेनिफर लॉरेंस, केट अप्टन आणि आणखी ही इतर अभिनेत्रींची नग्न छायाचित्रे इंटरनेट वर लीक केली होती. या साठी त्याला काही काळ शिक्षा देखील झाली. मोबाईल मधून खासगी मेसेजेस, फोटो काढून घेण्यात याचा हातखंडा आहे. आयफोन आणि गुगलचे पासवर्ड शोधून काढून अनेक व्यक्तींच्या बाबतीतली गुप्त माहिती त्याने आजवर लीलया हस्तगत केली आहे.

अल्बर्ट गोन्जालेझ असा हॅकर आहे, ज्याने लोकांच्या ऑनलाईन पैशाच्या देवाणघेवाणीची माहिती हस्तगत करून लाखो लोकांना कंगाल बनविले आहे. त्याच्याकडे सुमारे १७ कोटी लोकांच्या क्रेडीट आणि डेबिट कार्ड्स ची माहिती होती. त्यावरून तो लोकांच्या खात्यांमधील पैसे काढून घेत असे. इतकेच नव्हे तर ही माहिती तो इतर हॅकर्स ना पैशाच्या बदल्यात विकतही असे. याशिवाय नकली पासपोर्ट बनविणे, नकली हेल्थ इन्श्युरन्स कार्ड्स, नकली बर्थ सर्टिफिकेट बनविणे असे पुष्कळ गोलमाल धंदे अल्बर्ट करीत असे. अखेरीस अल्बर्ट पोलिसांच्या तावडीत सापडला व त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली.

केविन मिटनिक याला अमेरीकेतील सर्वात चलाख हॅकर समजले जाते. याने मोठमोठे गुप्त प्रोजेक्ट हॅक करून अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी प्रोग्रॅम मध्ये अडथळे आणले होते. अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फाईल्सही याने अगदी सहज हॅक केल्या होत्या. या सर्व गुन्ह्यांबद्दल त्याल तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आत केविन कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करीत आहे. केविन मिटनिकच्या आयुष्यावर दोन हॉलीवूड चित्रपट देखील बनविले गेले आहेत.

केविन पॉलसन याने एक रेडियो सिस्टम हॅक करून त्यावरील एका शो मध्ये पारितोषिक जिंकले होते. पारितोषिक म्हणून त्याला एक आलिशान पोर्शे गाडी मिळाली होती. त्याचा हा उद्योग एफबीआय च्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केविनवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. एफबीआयची नजर आपल्यावर आहे हे समजल्यावर केविन ने एफबीआय ला देखील सोडले नाही. त्याने एफबीआय च्या सिस्टम्स हॅक केल्या. त्याच्या ह्या प्रतापामुळे त्याला अर्थातच तुरुंगवासाची शिक्षा झाली, ही शिक्षा संपवून केविन आता पत्रकार बनला आहे आणि अमेरिकन पोलिसांची मदत करीत असतो.

Leave a Comment