खाडाखोड असलेल्या नोटा बँकांना घ्याव्याच लागतील – रिझर्व्ह बँक


नवी दिल्ली : सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिले असेल तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. पण या सगळ्यावर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. बँका ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर काही लिहिले असेल तरी अशा नोटा घ्यायला नकार देऊ शकत नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ५००-२००० च्या नोटांवर काहीही लिहिले असले किंवा नोटांचा रंगही जर गेला असला तरी या नोटा बँका नाकारू शकत नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

या नोटा बँका नाकारू शकत नाहीत पण ग्राहक बँकेत गेले तर त्यांना या नोटा बदलून मिळणार नाहीत पण त्यांना या नोटा आपल्या बँक खात्यांमध्ये जमा कराव्या लागतील, असेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. नव्या नोटा बदली करण्यासाठी नियमावली आलेली नसल्यामुळे लिहिण्यात आलेल्या नोटा बदलून मिळणार नाहीत.

इंटरनेट बँकिंगची सुविधा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा व्यक्तींनाही वापरण्यात येणार आहे. *९९# हा नंबर फोनवरून डायल केल्यावर इंटरनेट शिवाय दोन खात्यांमध्ये देवाण-घेवाण होऊ शकते. ग्राहकाला हा नंबर यासाठी डायल करून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

Leave a Comment