बँका कमी गर्दीची एटीएम बंद करणार


नोटबंदीनंतर बँकींग व्यवसायानेही त्यांचे खर्च कमी करण्यासाठी पावले टाकायला सुरवात केली असून ज्या एटीएम केंद्रांवर दिवसाला २०० पेक्षा जास्त हिट नाहीत ती एटीएम बंद करण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. बॅकांच्या शाखांपासून दूर अंतरावर असलेल्या एटीएमचा यात प्रामुख्याने समावेश असेल.

बंद करण्यात आलेली ही एटीएम ज्या बँकांमध्ये रोख रकमा काढण्यासाठी जादा गर्दी असते अशा शाखांमध्ये बसविली जाणार आहेत तर बाकीची ग्रामीण भागात बसविली जाणार आहेत. बँक ऑफ बरोडा, एसबीआय, पंजाब नॅशनल, युनियन, अलाहाबाद बँक अशा अनेक बँका यावर गांभीर्याने विचार करत असून कमी वापर असणार्‍या एटीएमची यादी केली जात आहे असे बँक अधिकार्‍यांकडून समजते.

मिळालेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर ऑनलाईन व्यवहारांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून एटीएम व कॅश कमी प्रमाणात वापरली जावी यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. एसबीआयमधील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी वर्दळ असलेली शहरी भागातील एटीएम ग्रामीण भागात बसविणे फायद्याचे आहे कारण ग्रामीण भागात एटीएमसाठी येणारा खर्च कमी असतोच शिवाय यामुळे ग्रामीण भागात बँकींग विस्तारालाही त्याचा हातभार लागू शकणार आहे.

Leave a Comment