४५९ स्ट्रॉ तोंडामध्ये ठेवण्याचा अजब विश्वविक्रम


ओडिशातील मनोजकुमार महाराणा या युवकाने नुकताच एक नवा विक्रम प्रस्थापित करून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव नोंदविले आहे. हा विक्रम आहे तोंडामध्ये एकाच वेळी ४५९ स्ट्रॉ धरण्याचा. सर्वाधिक स्ट्रॉ एकत्र तोंडामध्ये ठेवण्याचा विश्वविक्रम या आधी आठ वर्षांपूर्वी केला गेला होता. हा विक्रम मोडीत मनोजकुमार याने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

मनोज कुमारने हा विश्वविक्रम करण्याआधी, हा विक्रम सिमोन एल्मोरे याच्या नावाने नोंदलेला होता. त्याच्यापासूनच प्रेरणा घेत मनोजकुमार ने त्याचा विक्रम मोडीत हा नवा विक्रम केला आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी मनोज कुमारला ४५९ स्ट्रॉ एकाच वेळी तोंडामध्ये किमान दहा सेकंदांसाठी ठेवणे गरजेचे होते. ह्या दहा सेकंदांच्या दरम्यान मनोजला स्ट्रॉ सांभाळण्यासाठी त्याच्या हातांचा वापर करण्याची परवानगी नव्हती. पण हे स्ट्रॉ एकत्र राहावेत म्हणून त्यांना रबर बँडने बांध्याची अनुमती मनोजला देण्यात आली होती. तसेच हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्ट्रॉ ची गोलाई ०.६४ सेंटीमीटर असणे गरजेचे होते.

पण अखेरीस मनोज कुमारच्या प्रयत्नांना यश आले, आणि ४५९ स्ट्रॉ एकत्र, दहा सेकंद तोंडामध्ये धरून मनोज ने नवा विश्वविक्रम स्थापिला. या पूर्वी हे रेकोर्ड जर्मनी येथील सिमोन याच्या नावे होता. सिमोनने ४०० स्ट्रॉ एकाच वेळी तोंडामध्ये धरण्याचा विक्रम केला होता.