भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार शाओमी


बंगळूरू – भारतातील स्टार्टअपमध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी करणार आहे. देशातील १०० स्मार्टअपमध्ये पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ही गुंतवणूक करण्यात येईल. ही गुंतवणूक स्मार्टफोनसाठी अॅप निर्मिती करणा-या कंपन्यांसाठी असेल कंपनीचे व्यवस्थापकीय प्रमुख लुई जून यांनी म्हटले.

हंगामा आणि क्रेझीबी यासह सहा कंपन्यांतील हिस्सेदारी शाओमी आणि उपकंपनी असणा-या शुनवेई कॅपिटलने खरेदी केली आहे. ही गुंतवणूक आर्थिक तंत्रज्ञान, मजकूर, हायपरलोकल सर्व्हिसेस, मोबाईल फोन दुरुस्ती, मोबाईल इंटरनेटच्या उत्पादनांची निर्मिती करणा-या कंपन्यांत करण्यात येईल. चीनमधील ३०० कंपन्यात गेल्या चार वर्षात कंपनीने ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारतात चीनमध्ये यशस्वी ठरलेले मॉडेल राबविण्यात येईल. सर्व प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांचा समावेश शाओमीच्या व्यवसाय मॉडेलमध्ये आहे. गेल्या सात वर्षात कंपनीने अनेक कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यात आल्याने भरारी घेतल्याचे त्यांनी म्हटले.

शाओमीचा जगातील सर्वात मौल्यवान खासगी तंत्रज्ञान कंपन्यामध्ये समावेश आहे. अलिबाबा गुप होल्डिंग आणि टेन्सेन्ट होल्डिंग यानंतर भारतातील गुंतवणुकीबाबत शाओमीचा क्रमांक लागतो. भारतात २०१४ मध्ये प्रवेश केलेल्या कंपनीचा स्मार्टफोनमधील हिस्सा २३.५ टक्के आहे. तीन महिन्यापूर्वी हा १७ टक्के होता. ६० देशात स्मार्टफोन विक्री करणा-या कंपनीची चीनव्यतिरिक्त भारत ही मोठी बाजारपेठ आहे.

Leave a Comment