बकरा मेला, जगातील लाखो लोक रडले


ऑस्ट्रेलियातील गॅरी नावाच्या बकर्‍याचा नुकताच मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूमुळे जगभरातील लाखो लोकांचे डोळे पाणावले असल्याची घटना घडली आहे. गॅरीच्या मृत्यूचे वृत्त येताच ३० हजार जणांनी शोक संदेश पाठविले आहेत तर अनेकांनी त्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गॅरी कोणी ऐरागैरा बकरा नव्हता. तो सोशल मिडीयाचा स्टार बकरा होता व त्याचे १७ लाख फॉलोअर होते.

गॅरी हा जेम्स डिजारन यांच्या मालकीचा बकरा. २०१३ साली तो चर्चेत आला त्याला कारण घडले त्याला ठोठावला गेलेला अठ्ठावीस हजारांच्या दंडामुळे. गॅरीने सिडने म्युझियम बाहेर लावलेली फुले खाल्ली व त्यामुळे त्याला हा दंड ठोठावला गेला होता. अर्थात गॅरीच्या मालकाचे त्याविरोधात केस केली व ती जिंकलीही. गॅरीला ट्रॅव्हलिंग कॉमेडी नाटकातील कामामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली होती. अनेकांनी शरीरावर गॅरीचे टॅट्यू काढले होते. गेले काही दिवस गॅरी आजारी होता. त्याला ट्यूमर झाला होता व त्याच्यावर दीर्घ काळ उपचारही सुरू होते. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही व अखेर त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment