डुंगरपूरचे अतर्क्य देवसोमनाथ मंदिर


राजस्थानच्या उदयपूर व डुंगरपूर सीमेवर असलेले देवसोमनाथ शिवमंदिर हे देशातील एक महत्त्वाचे व वास्तुकलेच्या दृष्टीने अद्भूत असे मंदिर आहे. १२ व्या शतकात बांधल्या गेलेल्या या तीन मजली मंदिराचे बांधकाम संपूर्णपणे दगडाचे आहे मात्र त्यात कुठेही वाळू, रेती, चुना यांचा वापर केला गेलेला नाही. एकावर एक दगड रचून हे मंदिर बांधले गेले आहे. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली असलेले हे मंदिर सोम नदीच्या काठी वसलेले आहे. असेही सांगितले जाते की हे मंदिर एका रात्रीत बांधले गेले होते.


गुजराथमधील सोमनाथ प्रमाणेच या मंदिराचे डिझाईन आहे व त्याचे नांव सुरवातीला सोमनाथच होते मात्र भाविकांनी त्यात देव शब्द अॅड केल्यावर ते देवसोमनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिराच्या परिसरात अनेक शिलालेख आहेत मात्र त्यावरील मजकूर स्पष्ट वाचता येत नाही. पुरातत्त्व विभागानुसार हे माळवा शैलीचे मंदिर १२ व्या शतकात स्थानिक रजपूत राजांनी बांधले असावे. तीन मजली असलेल्या या मंदिरात गर्भगृह जमिनीखाली १० फुटांवर आहे. सभामंडप, अंतराळ अशी मंदिर रचना आहेच व त्याला तीन प्रवेशद्वारे आहेत. दगडी रथासारखे याचे बांधकाम आहे.

Leave a Comment