धुक्यामध्ये गाडी चालविताना घ्या या गोष्टींची काळजी


आता देशभरामध्ये थंडीची चाहूल लागत आहे. काही ठिकाणी आता दाट धुक्याला ही सुरुवात होते आहे. उत्तर भारताच्या बहुतेक राज्यांमध्ये धुके पडणे सुरु झाले असून, हळू हळू जसजशी थंडी वाढत जाईल, तसतसे धुके देखील वाढत जाईल. विशेषतः सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर धुक्याचा प्रभाव जास्त जाणवतो. असे कित्येक लोक आहेत, ज्यांना कामानिमित्त भल्या पहाटे घर सोडावे लागते, आणि रात्री उशिराने घरी परतावे लागते. काहींचे सतत फिरतीचे काम असते. अश्या वेळी कितीही धुके असले, तरी घराबाहेर पडावेच लागते. धुक्यामुळे अनेकदा समोरून येणाऱ्या गाड्या न दिसल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना आपण पहात असतो, किंवा ऐकत असतो. त्यामुळे भर धुक्यातून गाडी चालविण्याची वेळ आलीच, तर काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात.

दाट धुक्यामधून गाडी चालविताना आपल्या गाडीचा वेग अतिशय सावकाश ठेवा. रस्ता मोकळा असेल तर गाडी भरधाव चालविण्याकडे चालकांचा कल असतो. पण धुके पडलेले असताना गाडी भरधाव वेगाने चालविणे धोकादायक ठरू शकते. धुक्यामुळे आपल्या समोरची गाडी किंवा विरुद्ध दिशेने येणारी गाडी, अचानक समोर आलेली वळणे पटकन दिसत नाहीत, आणि जेव्हा दिसतात, तेव्हा गाडीवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसते. म्हणून मुळातच गाडीचा वेग मर्यादित ठेवायला हवा.

धुक्यामुळे बाहेरचे वातावरण जरी सुंदर दिसत असले, तरी गाडी चालविताना आपले सर्व लक्ष रस्त्यावर केंद्रित ठेवा. धुक्याचा आनंद घेत निसर्गाचे दर्शन घ्यायचे असल्यास गाडी एका कडेला उभी करून मग निसर्गाचा आनंद लुटा. गाडी चालवीत असताना धुक्याचे किंवा आसपासच्या निसर्गाचे फोटो घेण्याचे आवर्जून टाळा. कोणत्याही परिस्थितीत गाडी चालविण्यावरून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका.

जर कार मधून प्रवास करीत असाल, तर कारचा हिटर फार वेळ सुरु ठेऊ नका. असे केल्याने कारच्या काचेवर वाफ जमून काच धूसर होण्याची शक्यता असते. हीटर चालवायचाच असेल, तर थोड्या थोड्या वेळाने बंद करीत राहा आणि मग परत सुरु करा. त्याचप्रमाणे गाडी चालवीत असताना फोनवर बोलणे, मेसेज पाठविणे किंवा वाचणे, म्युझिक सिस्टम सेट करणे इत्यादी प्रकार करणे टाळा.

धुक्यातून गाडी चालविताना दिवसा उजेडी देखील गाडीचे हेडलाईट चालू ठेवा. तसेच कारच्या मागच्या बाजूला देखील प्रखर प्रकाश असलेली एलईडी स्ट्रीप लाऊन घ्या. या मुळे तुमच्या मागून येणाऱ्या गाडीला तुमची गाडी सहज दिसेल, तसेच तुमच्या गाडीचे हेडलाईट चालू असल्याने, समोरून येणाऱ्या गाडीलाही तुमची गाडी दिसू शकेल. मुळात प्रवासाला निघताना सुर्योदयाच्या आधी निघण्याचे टाळा, तसेच सूर्यास्तानंतर प्रवास करू नका.

Leave a Comment