टूथपेस्टचे असेही फायदे


टूथपेस्टचा वापर आपण आपल्या दातांना चमकविण्याकरीता करीत असतो. पण ह्या व्यतिरिक्त देखील टूथपेस्ट चे अनेकविध फायदे आहेत. आपला मोबाईल फोन आपण नेहमी आपल्या खिश्यामध्ये ठेवत असतो, किंवा महिला, मुली आपला मोबाईल आपल्या पर्समध्ये, बॅगमध्ये ठेवत असतात. पर्समध्ये किंवा खिशामध्ये असलेल्या इतर वस्तूंमुळे कित्येकदा मोबाईलच्या स्क्रीन वर चरे उठतात. हे चरे घालविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी थोडीशी टूथपेस्ट संपूर्ण स्क्रीनवर पसरवावी. साधारण एक मिनिटभर ही टूथपेस्ट स्क्रीन वर तशीच राहू दिल्यानंतर एका कोरड्या, मऊ सुती कपड्याने पेस्ट पुसून काढावी. पुसताना पाण्याचा वापर अजिबात करू नये. स्क्रीन स्वच्छ पुसल्यानंतर त्यावरील चरेदेखील गायब झाल्याचे दिसतील.

पावसाळ्यामध्ये आगपेटीमधील काड्या आर्द्र हवामानामुळे ओलसर होतात, व चटकन पेटत नाहीत. किंवा पावसात भिजल्यामुळे खिशातील आगपेटी भिजून त्यामधील काड्या ओलसर होतात. अश्या वेळी काडीच्या ज्या भागावर दारू असेल, म्हणजेच जो भाग पेटणारा असेल, तिथे थोडीशी टूथपेस्ट लावून तो भाग किंचित पाण्यामध्ये भिजवावा. त्यानंतर लगेचच काडी कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून कोरडी करावी. आता या काड्या वापरता येण्याजोग्या होतील.

जुने झालेले स्पोर्ट्स शूज पुन्हा एकदा चमकविण्याकरिता त्यांना टूथपेस्ट वापरून स्वच्छ करा. स्पोर्ट्स शूज एकदम नव्यासारखे दिसू लागतील. तसेच चांदीची भांडी उजळविण्या करिता देखील टूथपेस्ट चा वापर करा. चांदीच्या भांड्यांना आधी टूथपेस्ट लावून घासून घ्या आणि मग नेहमीप्रमाणे भांड्याच्या साबणाने चांदीची भांडी पुन्हा एकदा धुवा.

जर चेहऱ्यावर मुरुमे किंवा पुटकुळ्या येत असतील तर त्यांच्यावर थोडीशी टूथपेस्ट लावा. हा उपाय काही दिवस केल्याने चेहऱ्यावरील मुरुमे गायब होताना दिसतील.