जोधपूर- राव जोधाची राजधानी

राजस्थानतील प्रमुख शहर म्हणून ओळखले जाणारे जोधपूर आवर्जून पाहावे असे शहर आहे. मुबलक संगमरवराचा वापर करून बांधलेल्या सुंदर इमारती, आणि राजा रजवाड्यांचे महाल, हवेल्या याच्याबरोबरच खूप मोठा आणि किती खरेदी करावी आणि किती नको असा मोह पाडणारा बाजार ही या शहरातील मुख्य आकर्षणे. रस्ता मार्ग आणि रेल्वे मार्गाबरोबरच विमानसेवाही जोधपूरला जाण्यासाठी सोयीच्या आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत स्वस्त आणि सुंदर हॉटेल्स आपली राहण्याची सोय करायला सज्ज आहेत. सांगायची गोष्ट अशी की इथल्या हॉटेल्समधून खमंग बाजरीची भाकरी, दही, लोणी, लोणची हा मेनू कायम उपलब्ध असतो. अन्य राजस्थानी पदार्थ तृषा भागवायला सज्ज असतातच.

राठौड कुलाचा प्रमुख राव जोधा. १४५९ साली त्याने हे शहर वसविले. आपण रामाचे वंशज आहोत असे तो सांगत असे. या राणाने बांधलेला १२५ मीटर उंचीच्या खडकाळ टेकडीवरचा मेहरणगड हे या शहराचे मुख्य आकर्षण. आठ दरवाजे असलेले, असंख्य बुरूज असलेली १० किमी लांबीच्या उंचच उंच भिंतीने वेढलेले हे शहर १६ व्या शतकातले प्रमुख व्यापार केंद्र होते.

मेहरणगड पाहायला जायचे असेल तर या पहाडावर जाण्यासाठी चकक लिफ्टची सोय केली आहे. मात्र आपल्याला इच्छा असेल तर आपण दगडी बांधणीच्या रस्त्यावरून चढत चढतही गडावर जाऊ शकतो. इतक्या उंचीच्या या गडावर पाणी आणण्यासाठी केलेली त्याकाळची व्यवस्था थक्क करणारी. गडाच्या तटावरून सार्‍या शहराचा नजारा पाहता येतो आणि लक्षात येतात निळ्या रंगाच्या भितींची घरे. आजकाल आपण जातपात मानत नाही. मात्र जोधपूरमध्ये आजही ब्राह्मण लोकांनी घराची एक तरी भिंत निळ्या रंगाने रंगवायची पद्धत आहे. त्यामुळे या शहराला ब्लू सिटी असेही म्हटले जाते. मेहरणगडावर पाहायच्या अनेक इमारती, महाल, संग्रहालये. त्यातील मोतीमहाल, फूलमहाल, शीशमहाल, दौलतखाना या महत्त्वाच्या इमारती. यातील एका महालाचे छत चक्क ८० किलो सोने वापरून सजविण्यात आले आहे. येथे नाचगाणी होत असत. म्हणजे हे राजे किती हौशी होते पहा.

जोधपूरचा राणा हा चांगला भरभक्कम म्हणजे जवळजवळ सात फूट उंचीचा होता असे सांगतात.या राजाचे कपडे, चिलखत, त्याचा बिछाना, शस्त्रे आजही जपून ठेवली आहेत. या राजाला ५६ राण्या होत्या असेही सांगतात. त्यामुळे राजाच्या शयनगृहाला लागूनच असलेली ५६ खोल्याची ही इमारत. विशेष म्हणजे या इमारतीतील संग्रहालयात १५ प्रकारचे विविध नमुन्यांचे बाळांना झोपवायचे पाळणेही आहेत. जाळीदार, तसेच रंगीत तावदानांची सजलेल्या खिडक्यांनी नटलेल्या इमारती. संग्रहालयात हिरेजडीत, रत्नजडीत तलवारी, बाकी शस्त्रे, दागिने, त्याकाळातले कपडे पाहायला मिळतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पालख्या, अंबार्‍या, संगीत वाद्ये, लाकडी सामान, पेंटिग्ज आहेतच. गड पाहताना गाईडची मदत अवश्य घ्यावी.

राजवाड्यानंतर जसवंत थडा म्हणजे महाराणा जसवंतसिंग याचे संगमरवरी स्मारक पाहावे आणि मग भेट द्यावी उमेदभवनला. २०व्या शतकात बांधलेला हा एकमेव राजवाडा. विशेष म्हणजे त्याकाळी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार देण्यासाठी हा राजवाडा बांधला गेला.१६ वर्षे हे काम सुरू होते. संपूर्ण सँडस्टोनमध्ये बांधलेला हा राजवाडा. या राजवाड्यात आजही राजा राहतो आणि अर्ध्या राजवाड्यात हॉटेल आणि संग्रहालय आहे. जोधपूरमधील हे अतिशय ऐषारामी हॉटेल म्हणून गणले जाते. महागही तितकेच.

जोधपूरपासून साधारण ९ किमीवर असलेले मंडोर उद्यान ही प्राचीन मारवाडची राजधानी. येथे आहेत शासकांची स्मारके आणि सुंदर उद्यान. शेवटी भेट द्यायची ती सरदार बाजारला. दोन्ही बाजूंनी अरूंद गल्ल्या असलेल्या या भागात अनेक छोटी छोटी दुकाने. विविध हस्तकलेच्या वस्तू, व्हाईट मेटलमधली कलाकुसर केलेली भांडी, चौरंग, चांदीची भांडी, लाकडी खेळणी, बांधणी कापड, साड्या, उत्तम प्रकारची बेडशीटस खचाखच भरलेली ही दुकाने आपली खरेदीची हौस पुरेपूर भागवितात. दमला असाल तर चविष्ट सामोसे, बंगाली मिठाईचा आस्वाद देणारी दुकाने आहेतच. लखारा बाजारालाही भेट द्यायला विसरायचे नाही. मांड पद्धतीच्या लोकगीतांचा दोन दिवसांचा उत्सव येथे दरवर्षी पौर्णिमेला साजरा होतो. या शहराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे आक्टोबर ते मार्चपर्यंतचा.

Leave a Comment