जंगलातील भटकंती आवडते, मग ब्लॅक फॉरेस्टला जरूर भेट द्या


अनेकांना जंगलातील भ्रमंती मनापासून आवडते. अशा जंगलभटक्यांसाठी जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट ही मस्त आणि मस्ट व्हिजिट जागा आहे. जर्मनीच्या दक्षिण पश्चिम भागातील बांडेन व वुटेंमबर्ग मध्ये हे आयताकार जंगल पसरले असून त्याची उंची ४८९८ फूट, लांबी २०० किमी व रूंदी ६० किमी आहे. डोंगरदर्‍या, सुंदर नद्या, झरे व घनदाट वृक्षराजी, अनेक दुर्मिळ वन्य प्राणी व चित्ताकर्षक रंगांचे विविध जातीचे पक्षी यांचे हे निवासस्थान आहे. प्रत्यक्षात हिरवेगार असलेल्या या जंगलाला ब्लॅक फॉरेस्ट नाव दिले ते रोमाने याने. याचे कारण म्हणजे हे जंगल इतके घनदाट आहे की सूर्य किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत व त्यामुळे येथे अंधार असतो. ही एक पर्वत श्रृंखलाच आहे.


या जंगलात खूप झरे आहेत व त्यांनी जंगलाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे. या झर्‍याकाठी बसून पाण्याचे तुषार अंगावर घेणे व थंड हवेचा लुफ्त चाखणे ही आनंदाची परमावधी म्हणता येते. या जंगलाचा मध्यभाग अधिक देखणा आहे. येथून किन्जिंग नदी वाहते. चीड व देवदार वृक्षांच्या दाटीतून सुंदर पायवाटा आहेतच पण माऊंट बायकींग, स्कीईंगचे मार्गही येथे काढले गेले आहेत. या जंगलातील रस्त्यांची लांबी २० हजार किलोमीटर भरते. हे सर्व रस्ते सुरक्षित आहेत. येथे अनेक जंगली प्राणी, घारी, घुबडांसह अनेक रंगांचे पक्षी पाहायला मिळतात.


येथे लाकडावरील व दागिन्यांवरील कोरीवकामही पाहण्यासारखे आहे तसेच ब्लॅक फॉरेस्ट हॅम, ब्लॅक फॉरेस्ट केक आतिशय प्रसिद्ध आणि चविष्ट आहेत. या जंगलाच्या परिसरात अनेक शहरेही आहेत. ही शहरे पर्यटकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. फ्रार्टबर्ग, शिल्टक, हासलाक अशी ही शहरे आहेत.

Leave a Comment