भारतीय मुलीच्या चित्राशी छेडछाड केल्याबद्दल पाकिस्तानी ट्वीटर खाते सस्पेंड


एका भारतीय मुलीच्या छायाचित्रात फेरफार करून भारताची बदनामी केल्याबद्दल एक अधिकृत पाकिस्तानी ट्वीटर खाते सस्पेंड करण्यात आले आहे. अनेक भारतीय वापरकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर ट्वीटरने ही कारवाई केली.

पाकिस्तान डिफेन्स (@defencepk) हे अधिकृत हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. कवलप्रीत कौर नावाच्या भारतीय विद्यार्थीनीच्या छायाचित्राचा वापर त्याने भारताच्या विरोधात केला होता.

कवलप्रीत हिने जून 2017 मधील नॉट इन माय नेम (#NotInMyName) या कॅम्पेनमध्ये भाग घेतला होता. भारतात होणाऱ्या मॉब लिन्चिंगच्या घटनांशी ही मोहीम संबंधित होती. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी असलेल्या कवलप्रीतने तिच्या हँडलवरून स्वतःचे एक छायाचित्र पोस्ट केली होती. यात तिने हातात एक फलक घेतला होता आणि त्या छायाचित्रात मी एक भारतीय नागरिक असून मी धर्मनिरपेक्ष राज्यघटनेसोबत उभी आहे, असा मजकूर लिहिला होता. धार्मिक कारणांवरून मुस्लिमांच्या हत्येला ती विरोध करत राहीन, असे तिने लिहिले होते.

पाकिस्तान डिफेन्स या ट्विटर हँडलने याच छायाचित्रात फेरफार केला होता. छायाचित्रातील फलकावर भारताच्या विरोधातील मजकूर लिहिला होता. “मी भारतीय आहे पण मला भारताचा तिटकारा आहे कारण ही एक वसाहतवादी संस्था आहे. याने नागा, काश्मीर, मणिपुरी आदि राज्यांवर कब्जा केला आहे,” असे त्यात लिहिले होते.

कवलप्रीतला हे कळाल्यानंतर तिने ट्वीटरवरूनच हा विषय उपस्थित केला आणि या खात्याची माहिती ट्वीटरला कळविण्याचे आवाहन केले. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या पेजला रिपोर्ट करणे सुरू केले. त्यानंतर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले हे खाते ट्विटरने निलंबित केले.

Leave a Comment