टेस्लाची नवी सुपर वेगवान कार


इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात क्रांती करणार्‍या टेस्लाने १.९ सेकंदात ० ते १०० किमी वेग घेऊ शकणारे रोडस्टर या त्यांच्या कारचे नवे मॉडेल सादर केले असून प्रतितास १६० किमीचा वेग ही कार फक्त चार सेकंदात घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड सांगितला गेलेला नाही मात्र ती ताशी ४०० किमीपेक्षा अधिक वेगाने धावू शकते असे समजते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार ११०० किमीचे अंतर तोडू शकते असा दावा केला जात आहे.

ही कार बुक करण्यासाठी ५० हजार डॉलर्स भरावे लागणार आहेत व कारची डिलिव्हरी त्वरीत हवी असेल तर अडीच लाख डॉलर्स देऊन ती विकत घेता येणार आहे. टेस्लाने पहिली रोडस्टर २००८ ते २०१२ या काळात उत्पादित केली होती आता या कारचे दुसरे व्हर्जन बाजारात आणले गेले आहे.

याचबरोबर कंपनीने नवा सेमी इलेक्ट्रीक ट्रकही बाजारात आणला आहे. हा ट्रक ४० टनी वजनाचा असून तो ५ सेकंदात १०० किमीचा वेग गाठू शकतो. हा सेमी इलेक्ट्रीक ट्रक मेगाचार्जरच्या सहाय्याने फक्त ३० मिनिटांत फुल चार्ज होतो व एकदा चार्ज झाल्यानंतर तो ६५० किमीचे अंतर कापू शकतो. कंपनीने हा ट्रक सर्वात सुरक्षित व आरामदायी असल्याचा दावा केला आहे.

हा ट्रक चालविण्यासाठी डिझेलपेक्षा २० टक्के कमी खर्च येतो व ऑटो पायलट सिस्टीमचा वापर करून एकावेळी अनेक ट्रकचा ताफा हायवेवरून जात असेल तर ऑपरेटिंग कॉस्टही कमी होते. या ट्रकसाठी सुरक्षेचे खास उपाय केले गेले आहेत.ऑटो ब्रेकिंग सिस्टीम शिवाय लेन ट्रॅकींग, विंडशिल्डसाठी न्यूक्लीअर एक्स्प्लोजन प्रूफ ग्लास त्याला दिली गेली आहे.

Leave a Comment