मुंबईतील महिला रेल्वे प्रवाश्यांचा सुरक्षिततेसाठी नवीन अॅप


मुंबईमधील लोकलने दररोज चर्चगेट ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ने नुकतेच एक नवीन अॅप लॉन्च केले आहे. ह्या अॅपचे नाव ‘आयवॉच सेफ’ असे असून या अॅपच्या माध्यमातून संकटकाळी अलर्ट बटनच्याद्वारे मदतीसाठी संदेश पाठविण्याची सोय करण्यात आली आहे.

महिलांनी हे अॅप आपल्या मोबाईल फोनवर इन्स्टॉल करायचे आहे. या अॅपमध्ये असलेले अलर्ट बटन, कोणत्याही प्रकारचा धोका जाणविल्यास महिलांनी त्वरित दाबायचे आहे. अलर्ट बटन च्या ऐवजी फोनचे पावर बटन जरी चार वेळा दाबले तरी ही हे अॅप अॅक्टीवेट होऊन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी संदेश पोहोचविता येणे शक्य होणार आहे.

महिलांनी हे अॅप इंस्टॉल करताना आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा नंबरही या मध्ये सेव्ह करायचा आहे. एखाद्या महिलेने मदतीसाठी संदेश पाठविला असता, हा संदेश आरपीएफ च्या नियंत्रण कक्षासोबतच त्या महिलेने सेव्ह केलेल्या नंबरवरही हा संदेश पाठविला जाणार आहे. या अॅप द्वारे मदतीसाठी संदेश पाठविणाऱ्या महिलेचे नाव आणि तिने जिथून हा संदेश पाठविला त्या ठिकाणाची माहिती नेट द्वारे आरपीएफ च्या नियंत्रण कक्षाला त्वरित माहित होणार असल्याने ताबडतोब मदत पाठविणे शक्य होणार आहे.

हे अॅप आतपर्यंत एक लाख युजर्सनी डाऊनलोड केले आहे. ह्या अॅप मध्ये बॅटरी स्टेटस, नेटवर्क स्ट्रेन्ग्थ, संबंधित महिलेचा रक्तगट इत्यादी माहिती समजणार आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना वापरता येणार आहे.

Leave a Comment