व्हाईट गोल्ड बद्दल एकलेय?


भारतीय कुटुंबात सण समारंभ, लग्नकार्य अशा मंगल प्रसंगी सोने चांदी शिवाय पान हलत नाही. सोने म्हणजे पिवळा धातू ही आपली ठाम कल्पना आहे. मात्र या सोन्याचा आणखी एक प्रकार आहे तो व्हाईट गोल्ड म्हणजे पांढरे सोने. विशेष म्हणजे जगभरात या पांढर्‍या सोन्यालाही चांगली मागणी आहे व कधीकधी ते पारंपारिक पिवळ्याधमक सोन्यापेक्षा महागही विकले जाते.

सोन्यात पॅलेडियम, प्लॅटिनम, चांदी, निकेल, रोडियम हे धातू मिसळले तर ते पांढरे सोने म्हटले जाते. यात प्लॅटिनम मिसळले गेले असेल तर त्याची किंमत नेहमीच्या सोन्यापेक्षा अधिक असते. बाजारात निकेल मिसळलेले व्हाईट गोल्ड अधिक प्रमाणात खपते कारण ते थोडे स्वस्त पडते. या सोन्यापासून बांगड्या, ब्रेसलेट, कानातले डूल, हार, अंगठ्या, चेन असे अनेक दागिने बनविले जातात. व्हाईट गोल्डला हिर्‍यापेक्षा जास्त रिसेल व्हॅल्यू मिळते असे सांगतात. अशा सोन्यापासून बनविलेले दागिने वेस्टर्न स्टाईलचे वाटतात. बाजारात सध्या प्लॅटिनम पेक्षाही याच सोन्याच्या दागिन्यांना अधिक मागणी आहे. हे दागिने पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांपेक्षा अधिक मजबूत आहेत व ते टिकतातही अधिक. त्यावर सहजा स्क्रॅच येत नाहीत. अर्थात जुने होत जातील तशी त्यांची चमक कमी होते मात्र पुन्हा पॉलिश करून ते नव्यासारखे दिसतात.

Leave a Comment