इंदूरजवळ २० कोटी रूपये खर्चून बनले स्वामीनारायण मंदिर


इंदुर खांडवा रस्त्यावर १४ महिन्यात २० कोटी रूपये खर्चून भव्य स्वामी नारायण मंदिर उभारण्यात आले असून १९ नोव्हेंबर रोजी या मंदिरात शोभा यात्रा काढून दिपप्रज्वलन केले जाणार आहे.१ एकर जागेत बांधण्यात आलेल्या या मंदिराला ५ शिखरे,४ घुमट व २३८ स्तंभ आहेत. या मंदिराची उंची आहे ९१ फूट. स्तंभांवर संत, गंधर्वांच्या ९० सुंदर मूर्ती कोरल्या गेल्या आहेत शिवाय फुले, मोर, वेलबुट्टीची अप्रतिम नक्षीही दगडातून जिवंत केली गेली आहे. ओरिसा, गुजराथ, महाराष्ट्र, राजस्थान व मध्यप्रदेशातील १०० कुशल कारागिरांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हे काम १४ महिन्यात पूर्ण केले आहे.

मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानी व दक्षिण भारतीय शैलीत हे बांधकाम केले गेले आहे. संचालक कांतिभाई म्हणाले, मंदिर द्वारावर दोन मोठे हत्ती आहेत. गाईसह मुरलीधर कृष्णाची प्रतिमा बसविली गेली आहे तर उत्तर दक्षिण द्वारांवर ४ सिंह मूर्ती आहेत. छतावर अतिशय सुंदर नक्षी आहे. मुख्य सिंहासनावर सोन्याचा पत्रा चढविला गेला आहे. हे काम सुरतच्या कारागिरांनी केले आहे. मुख्य शिखरासाठी स्वामी नारायण भगवान घनश्याःमाची ५ फुटी मूर्ती सुवर्ण सिंहासनावर प्रतिष्ठित केली जाणार आहे. याशिवाय राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, हनुमान गणपती व शिवलिंगाची स्थापना विविध शिखरांखाली केली जाणार आहे. मंदिराच्या परिसरात संत निवास व भक्तनिवासही उभारले गेले आहेत.

Leave a Comment