मुंबई – भारताच्या रेटिंगमध्ये मूडीज या आर्थिक क्षेत्रातील मातब्बर मानांकन संस्थेने वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून आला आहे. सेन्सेक्सने बीएसईवर उलाढाल सुरु होताच ४०० अंकांनी उसळी घेतली. तर १०० अंकांची वाढ निफ्टीमध्येही नोंदवण्यात आली. सेन्सेक्स आज ३३,३८८ अंकांवर खुला झाला. तर दिवसभराच्या उलाढालींना सुरुवात होत असताना निफ्टी १०,३२७ अंकावर पोहोचला.
मूडीजच्या रेटिंगमुळे बीएसई, एनसीईवर सकारात्मक परिणाम
आज कामकाज सुरु होताच बीएसईमधील टॉप-३० शेअर्सनी ३८१.७५ अंकांची उसळी घेतली. यानंतर काही वेळातच सेन्सेक्स कालच्या तुलनेत ४०० अंकांनी वधारला. तर सुरुवातीलाच निफ्टी-५०ने १०९.८० अंकांची वाढ नोंदवली. भारताच्या मानांकनात मूडीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने सुधारणा केल्याचे परिणाम सकाळच्या सुमारास शेअर बाजारात पाहायला मिळाले.
बीएसई आणि एनएसईला मूडीजकडून भारताचे रेटिंग वाढवण्यात आल्याचा फायदा झाला असून आयसीआयसीआय, टाटा स्टिल, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदाल्कोच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये चांगली वाढ झाली आहे. पण आयटी क्षेत्राला मूडीजकडून रेटिंगमध्ये करण्यात आलेल्या सुधारणेचा फारसा फायदा झालेला नाही. आयटी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्सच्या दरांमध्ये घरसण झाली आहे. आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले असले, तरी बँकिंग, इंधन आणि वायू, ऑटोमोबाईल, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत.