फेस टॅगर अॅप स्कॅन करणार आरोपींचे चेहरे


चेन्नई पोलीस आतापासून नव्याने तयार करण्यात आलेल्या फेस डिटेक्टिंग मोबाईल अॅप द्वारे गुन्हेगारांना पकडून गजाआड करणार आहेत. ह्या अॅप द्वारे आतापर्यंत पाच गुन्हेगारंना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. ‘ फेस टॅगर ‘ नावाचे हे अॅप एखाद्या संशयित आरोपीचा चेहरा स्कॅन करण्यास सक्षम असून, हे अॅप पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीशी कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे ह्या गुन्हेगाराची माहिती त्वरित पोलिसांकडील गुन्हेगारांच्या कॉम्प्यूटराईझ्ड यादीमध्ये तपासून घेता येणे शक्य होणार आहे. चेन्नईमधील एका कंपनीने हे अॅप तयार केले आहे.

ह्या अॅपचा वापर करण्यास नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेपासून सुरुवात झाली असून, या अॅपच्या सहायाने पोलिसांनी पाच गुन्हेगारांना अटक देखील केली आहे. हे अॅप आतापर्यंत चेन्नई मधील टी नगर या भागातील पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर इंस्टॉल केले गेले असून, यामध्ये बीट पॅट्रोल (गस्त) करणारे पोलीस कर्मचारी, सेक्टर मधील पोलीस कर्मचारी, स्टेशन हाऊस ऑफिसर्स या पदावर कार्यरत असणारे सब इन्स्पेक्टर, आणि सहायक पोलीस आयुक्त ह्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वर हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे अॅप मोबाईलवर सेव्ह करण्यासाठी केवळ १० एमबी स्पेस वापरली जाते. ह्या अॅप द्वारे गुन्हेगारांची माहिती असलेला डेटाबेस मोबाईलवर उपलब्ध होतो. ह्या डेटाबेस चे विभाजन वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. स्कॅन केलेला संशयित गुन्हेगाराचा चेहरा या डेटाबेसद्वारे पडताळण्यात येतो आणि मग अॅप द्वारे डेटाबेस मध्ये असलेली गुन्हेगाराची सर्व माहिती पोलिसांना आपल्या मोबाईच्या मदतीने समजते. ह्या डेटाबेसमध्ये आतापर्यंत १२,००० गुन्हेगारांची माहिती उपलब्ध असून, गेल्या चार वर्षांमध्ये हा डेटाबेस तयार करण्यात आला आहे.

Leave a Comment