येतेय दुसरे आधार- ई लॉक


प्रत्येक देशवासियासाठी आधारकार्ड बंधनकारक केल्यानंतर आता घराचे अथवा कोणत्याही ठिकाणाचे पत्ते विनासायास शोधता यावेत यासाठी मोदी सरकार दुसरे आधार आणण्याचा विकार करत असून मॅपमाय इंडिया व दूरसंचार मंत्रालय यांच्यामध्ये त्यासंदर्भातला करार नुकताच करण्यात आला आहे. नवीन आधारमध्ये सहा डिजिटचा नंबर असेल व हा नंबर तुमच्या घराचा, कोणत्याही ठिकाणाचा पत्ता अचूक सांगेल इतकेच नव्हे तर मॅपवर त्याचे लोकेशनही दाखविणार आहे. ई लॉक असे या नव्या आधारचे नामकरण केले गेले आहे.

या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. यामुळे पोस्टमनला पत्ता शोधणे सहज शक्य होणार आहे. प्रत्येक घरासाठी दिलेला सहा आकडी नंबर ई लॉक एंटर करून सर्च केला की नकाशा मिळू शकणार आहे. भारतात पर्यटनासाठी येणार्‍यांना त्यामुळे डेस्टीनेशन सर्च करणे, नेविगेट करणे तसेच संबंधित स्थळे शेअ्रर करण्याची सुविधा मिळेल. तसेच ई कॉमर्स, लॉजिस्टीक, फिल्ड ऑपरेटर अशा प्रकारची कामे करणार्‍या कंपन्यांचा पैसा व वेळ त्यामुळे वाचू शकणार आहे.

या प्रकल्पांतर्गत देशातील सर्व शहरे व गावांना सहा आकडी नंबर दिला जाईल. मॅप सोबत डेस्टीनेशनचा फोटोही दिसू शकणार आहेच पण त्याचबरोबर सरकारला अनेक प्रकारचा डेटा तयार करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. यात तुमची प्रॉपर्टी कुठे आहे, किती आहे, त्याचा कर तुम्ही किती भरता, फ्लॅटचा एरिया किती आहे, तुम्ही किती वीजबिल भरता, पाण्याचा वापर किती करता याची माहितीही सरकारला मिळणार आहे. तसेच या ईलॉकमुळे प्रत्येक व्यक्तीचे टॅक्स प्रोफाईल तयार करण्यासही सरकारला मदत मिळणार आहे. याचा उपयोग बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठीही करता येणार आहे.

Leave a Comment