पावसात भिजले किंवा धूळ-माती वगैरे उडाल्यानंतरही आपले कपडे घाणेरडे झाले नाहीत, तर आयुष्य किती सुलभ होईल? तर शास्त्रज्ञांनी असाच एक पदार्थ शोधून काढला आहे. त्यामुळे कपडे धुण्याची कटकट नाहीशी होणार आहे.
हा लेप घालवणार कपडे धुण्याची कटकट
हा पदार्थ म्हणजे द्रवपदार्थविरोधी लेप असून तो कपड्यावर लावला जाईल. त्यामुळे पावसाळ्यात कपडे कोरडेच राहतील. शिवाय तेल आणि मातीपासूनही हा लेप कपड्यांचा बचाव करेल. त्यामुळे कपडे धुण्याचे कष्ट वाचतील.
हाँगकाँग विद्यापीठातील प्राध्यापक वांग लिकियू यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी मायक्रोफ्लूडिक-ड्रॉपलेट आधारित द्रवरोधक मजबूत रचना आणि छिद्रे असलेला लेप विकसित केला.
वस्त्र, धातू आणि काचेसारख्या पदार्थांनी बनलेला हा लेप जलरोधक बनू शकतो. त्यामुळे या लेपावर पडणाऱ्या पाण्याचे किंवा तेलाचे थेंब चिकटण्याऐवजी दूर उडतील. पाणी, तेल आणि जैविक द्रव्यांसह 10 प्रकारच्या द्रवांचा या लेपावर कोणताही परिणाम होत नाही.
पाण्यात चालणाऱ्या वाहनांचे घर्षण रोखण्यासाठीही या लेपाचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे जहाज किंवा लष्करी उपकरणांचा वेग वाढविण्यास मदत होऊ शकते.