या विदेशी क्रिकेटपटूंच्या भारतीय पत्नी


भारतीय स्त्रियांमध्ये जे गुण आढळतात, ते जगामध्ये बाकी कोणत्याही देशातील स्त्रियांमध्ये आढळत नाहीत. मग त्यामध्ये भारतीय स्त्रियांचे सौंदर्य असो, किंवा त्यांची साधी रहाणी असो, संस्कार असोत, किंवा जीवनशैली असो, भारतीय स्त्रिया सर्वार्थाने सर्वगुणसंपन्न आहेत. म्हणूनच की काय जगभरातील सुप्रसिद्ध, नामांकित क्रिकेटपटूंनी भारतीय युवतींशी विवाह करण्यास पसंती दिली.

श्रीलंकेचा यशस्वी फिरकी गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन याने चेन्नईच्या मधीमलार राममूर्ती हिच्याशी २००५ साली विवाह केला. मधीमलार, मलार हॉस्पिटल्स च्या डॉक्टर एस राममूर्ती आणि नित्य राममूर्ती यांची कन्या आहे. मधीमलार आणि मुरलीधरन यांचा नरेन नामक एक मुलगाही आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी २०१० साली विवाह केला. त्यांचा विवाहसमारंभ हैदराबाद मधील एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये पार पडला. तसेच, पाकिस्तानी क्रिकेटपटू सैय्यद जहीर अब्बास याने रिता लूथरा हिच्याशी विवाह केला. या दोघांची भेट इंग्लंड मध्ये झाली होती. रिता तेव्हा इंग्लंड मध्ये उच्चशिक्षण घेत होती, तर जहीर तेव्हा तिथे काउंटी क्रिकेट खेळण्यास येत असे. तेव्हा या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर कालांतराने विवाहात झाले.

भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम साराभाई याची कन्या माना साराभाई आणि इंग्लंडच्या क्रिकेट टीमचे कप्तान असलेले माईक बेअर्ली यांचे एकमेकांवर प्रेम जडले. पण सुरुवातीला यांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. अखेर अनेक प्रयत्न केल्यानंतर शेवटी या प्रयत्नांना यश मिळाले आणि दोघांचा विवाह संपन्न झाला. सध्या हे दोघे इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा पूर्व क्रिकेटपटू आणि गोलंदाज शॉन टेट ह्याने भारतीय असलेल्या मासूम सिंघाशी विवाह केला आहे. २०१४ साली मुंबईमध्ये आठवडाभर चाललेला या विवाहसोहोळा पार पडला. ह्या विवाहसोहोळ्यामध्ये युवराज सिंह आणि जहीर खान पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाकिस्तानचा पूर्वक्रिकेटपटू मोहसीन खान याने बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय हिच्याशी विवाह केला. त्यानंतर हे दाम्पत्य मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. पण काही काळानंतर दोघांच्यात असामंजस्य निर्माण झाल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि मोहसीन आपल्या मायदेशी परतला.

न्यूझीलंडचे नामवंत क्रिकेटपटू ग्लेन टर्नर एक उत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय असलेल्या सुखविंदर कौर गिल यांच्याशी विवाह केला. ग्लेन सध्या न्यूझीलंड क्रिकेट सिलेक्शन बोर्डचे प्रमुख असून सुखविंदर तेथील सामाजिक नेत्या आहेत.