हिवाळी अधिवेशनानंतर होऊ शकतो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. पण राज्य मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळते आहे.

‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे मंत्री आणि नेते उपस्थित होते. काल रात्री उशिरा सुरु झालेली ही बैठक सुमारे तीन तास चालली.