…म्हणून मुली बँडबाजावर नाचल्या वडिलांच्या अंत्ययात्रेत


नवी दिल्ली – आजवर तुम्ही कधी वडिलांच्या अंत्ययात्रेत कोणाला नाचताना पाहिले आहे का? पण चक्क वडिलांच्या अंत्ययात्रेमध्ये बँडबाजावर दिल्लीतील नोएडा येथे मुलींनी नाच केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पण त्यामागे काहीतरी कारण होते, म्हणून या मुलींनी आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेत डान्स केला. शुक्रवारी दिल्लीतील नोएडा येथे गुटखा किंग या नावाने प्रसिद्ध असलेले पानविक्रेते हरिभाई लालवानी यांचे निधन झाले. दिल्लीतील एका रुग्णालयात ब्रेन स्ट्रोकने आजारी असलेले लालवानी यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आणि कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला.

लालवानी यांनी कुटुंबियांना मृत्यूपूर्वी आपली एक इच्छा बोलून दाखवली होती. कोणीही त्यांच्या मृत्यूनंतर दुःखी असू नये अशी त्यांची इच्छा असल्यामुळेच आपल्या मृत्यूनंतर बँडबाजासह वाजत-गाजत आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा त्यांच्या मुलींनी पूर्ण केली. लालवानी यांना चार मुली आहेत. त्यांना चारही मुलींनी खांदा दिला. तर, एकीने मुखाग्नी दिली. तसेच, मुलींनी वडिलांच्या इच्छेखातर अंत्ययात्रेत बँडबाजावर डान्सही केला. एका छोट्या दुकानापासून व्यवसायाला सुरुवात केलेले लालवानी अल्पावधीतच गुटखा किंग म्हणून नावारुपाला आले होते.