सौ. ठाकरेंनी केले सौ. पवारांचे तोंड भरून कौतुक


बारामती : गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात पवार व ठाकरे कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध नवनव्या अंगाने पुढे येताना पाहिले गेले. नुकताच याच मैत्रीचा एक नवीन आयाम पुढे आला. सुनेत्रा पवार यांच्या समवेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘दीपज्योती… एक प्रकाशपर्व’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थिती अनेकांना सुखद धक्का देणारी अशीच होती. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी केवळ उपस्थितीच लावली नाही, तर सुनेत्रा पवार यांच्या कार्याची मनोगतात प्रशंसा करत त्या दोघींमधील मैत्रीचीही माहिती जाहीरपणाने दिली.

अजित पवार व राज ठाकरे ही दोन्ही व्यक्तिमत्वे राज्याच्या राजकारणात कमालीची लोकप्रिय आहेत हे आपल्याला माहीतच आहे. हे दोघेही आपल्या खास शैलीतील भाषणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. एकमेकांची नक्कल करण्यापासून ते एकमेकांवर सडकून टीका करताना मागे पुढे न पाहणा-या या दोघांच्या पत्नींनी मात्र मैत्रीचा धागा जपल्याचे या कार्यक्रमातून पुढे आले. नेहमी ज्येष्ठ नेते शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते, पण ही मैत्री पवार व ठाकरे कुटुंबातील पुढील पिढीनेही कायम जपल्याचेच या निमित्ताने दिसले.

सुनेत्रा पवार यांच्या कार्यावर आधारित पुस्तक पुण्यातील अँड मिरॅकल या संस्थेचे विशाल हिरेमठ व त्यांच्या सहका-यांनी प्रकाशित केले होते. पुस्तकाचे प्रकाशन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. शर्मिला ठाकरे यांचा नामोल्लेख या वेळी निमंत्रण पत्रिकेत नव्हता, पण जेव्हा मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले व सूत्रसंचालकांनी शर्मिला ठाकरे यांचा उल्लेख केला तेव्हा प्रचंड टाळ्या पडल्या. या वेळी त्यांना बोलण्यासही सांगितले गेले. मला माझ्या नव-यासारख छान बोलता येत नाही अशी प्रांजळ कबूली भाषणाच्या सुरवातीलच देत केली.

सुनेत्रा पवार माझी मैत्रीण आहे आणि मुंबईत आम्ही वरचेवर भेटत असतो, खरतर ती अस काही काम करत असेल याची मलाही कल्पना नव्हती. काका (शरद पवार) आणि दादा (अजित पवार) आहेत म्हटल्यावर हिला काही करण्याची गरज आहे अस मला वाटलच नव्हत, पण ध्वनीचित्रफित पाहिल्यानंतर मलाही आता बारामतीला जाऊन तिचे काम पाहण्याची मनापासूनची इच्छा आहे. आम्हा सर्व मैत्रीणींना सुनेत्रा हिने बारामतीला घेऊन जावे, अशी इच्छा शर्मिला ठाकरे यांनी बोलून दाखविली. मुंबईतही पर्यावरणाची समस्या आ वासून उभी आहे, सुनेत्रा पवार यांनी मुंबईत जर हे काम सुरु केले तर पक्षीय भेद बाजूला सारुन मी त्यांच्यासमवेत उभी असेन अशी ग्वाही द्यायला शर्मिला ठाकरे विसरल्या नाहीत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार व ठाकरे कुटुंबातील मैत्रीपूर्ण संबंध किती दृढ आहेत याचीच प्रचिती आल्याची चर्चा कार्यक्रमानंतर होती.