महाराष्ट्र सरकार पतंजलीसाठी देणार ८०० एकर जमीन !


मुंबई : महाराष्ट्र सरकार ८०० एकर जमीन पतंजलीला २५ हजार कोटी रुपयांच्या गायींच्या प्रकल्पासाठी देणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

मागील आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नितीन गडकरी यांनी योगगुरु रामदेव बाबा यांच्या गायींच्या प्रकल्पासाठी विदर्भात एक हजार एकर जमिनीची मागणी केली होती. राज्य सरकारने त्यानंतर रामदेव बाबांच्या या प्रकल्पासाठी विदर्भाच्या हेटी (कुंडी) गावात ८०० एकर जमीन देणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. २५ हजार कोटी रुपये ऐवढी गायींच्या या प्रकल्पाची किंमत आहे. हा प्रकल्प रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या नेतृत्त्वात सुरु होईल.

पतंजली या प्रकल्पाअंतर्गत दहा हजार गायींची खरेदी करणार आहे. याद्वारे प्रजनन केंद्राचा विकास आणि डेअरी कामाला प्रोत्साहन दिले जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणार केली असता, अद्याप आमच्याकडे अशा आशयाचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे उत्तर देण्यात आले.

याबाबत माहिती देताना वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी सांगितले की, राज्याच्या पशुपालन विभागाचे हेटीमध्ये (कुंडी) आधीपासूनच प्रजनन केंद्र सुरु असून हे केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. पण पशुपालन विभागाच्या माध्यमातूनच त्याचा विकास केला जाईल. देशी गायींसाठी आमच्याकडे एक प्रजनन केंद्र आहे, जे हेटीमध्ये (कुंटी) आहे आणि त्याचे नाव गालाऊ आहे. ३२८ हेक्टर क्षेत्रात हे केंद्र पसरले असून त्यापैकी ४०.८० हेक्टर क्षेत्र आमच्या विभागाच्या अंतर्गत येते. तर वन विभागाचा उर्वरित २२७.२ हेक्टर क्षेत्रावर अधिकार असल्याचे पशुपालन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी सांगितले.