राहुल गांधींनी केला आपण शिवभक्त असल्याचा दावा


गांधीनगर – काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये निवडणूक प्रचार करताना आपण शिवभक्त असल्याचा दावा केला आहे. त्यांनी जाहीर सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि इतर पारंपरिक पद्धतीने प्रचार करत असतानाच मंदिरांना भेटी देण्याचाही सपाटा लावला आहे.

काँगेस राहुल गांधींच्या या कृतीमुळे सौम्य हिंदुत्वाची भूमिका घेत असल्याचा आरोपही होत आहे. गुजरातमध्ये हिंदुत्ववादाचा प्रभाव अधिक असल्याने काँगेसलाही त्यानुसार जुळवून घ्यावे लागत आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. तर मंदिरांना राहुल गांधींचे भेटी देणे याचा धर्माशी संबंध नसून ती नेहरू-गांधी घराण्याची परंपरा असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले आहे. तथापि, गांधी इतर राज्यांमध्ये जेव्हा प्रचारासाठी जातात, तेव्हा एवढय़ा प्रमाणात मंदिरांना भेटी देत नाहीत. मग त्यांनी हे धोरण गुजरातमध्येच का अंगिकारले आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे.