Skip links

राजस्थान पोलीस खात्यात कॉन्स्टेबलच्या पदावर पहिल्यांदाच तृतीयपंथी


जोधपूर – राजस्थान पोलीस खात्यात कॉन्स्टेबलच्या पदावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात ही घटना पहिली तर देशातील तिसरी आहे. ज्यात एखाद्या तृतीयपंथीयाला सरकारी नियुक्ती मिळाली आहे.

जालौर येथील रहिवासी तृतीयपंथी गंगाकुमारी हिच्या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश मेहता यांनी ६ आठवड्यात नियुक्ती देणे आणि २०१५ पासूनचे थकित देय रकम देण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी गंगाकुमारी ही पात्र असूनही तिला जालौर पोलीस अधिकाऱ्यांनी नियुक्ती दिली नव्हती, असे याचिकाकर्त्याकडून अधिवक्ता रितुराज सिंह यांनी सांगितले आहे.

२०१३ साली १२ हजार पदांसाठी घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल भरती परिक्षेत राणीवाडा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जालौरची रहिवासी गंगाकुमारी हिची निवड झाली होती. राज्यभरातून जवळपास सव्वा लाख जणांनी परिक्षेत भाग घेतला होता. यातील ११४०० जणांची कॉन्स्टेबल पदासाठी पोलिसांनी निवड केली होती.

गंगा ही तृतीयपंथी असल्याचे मेडिकलमध्ये स्पष्ट झाल्यामुळे पोलीस अधिकारी नियुक्ती करण्याच्या निर्णयावर गोंधळात पडले. गंगा ही तृतीयपंथीय असल्याचे स्पष्ट झाल्यावर जालौर एसपीने फाईल रेंज आयजी जोधपूर जीएल शर्मा यांना पाठवून गंगाच्या नियुक्तीवर सल्ला मागितला. पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने आयजीने ३ जुलै २०१५ ती फाईल पोलीस मुख्यालयात पाठवली होती. पण पोलीस अधिकारी येथेही त्यावर निर्णय घेऊ शकले नाही. त्यानंतर त्यावर मार्गदर्शनासाठी ही फाईल पुढे पोलीस विभागाने गृह खात्याकडे रवाना केली.

Web Title: For the first time in the Rajasthan Police Department constable has been appointed transgender